
Kolhapur News: महिलांसाठीच्या सवलत योजनेत राज्यात कोल्हापूर ‘नंबर वन’
कोल्हापूर : राज्य शासनाने महिलांना एसटी तिकीट भाड्यात ५० टक्के सवलत दिली. या योजनेला महिलांकडून उदंड प्रतिसाद लाभत असून, राज्यात कोल्हापूर विभाग ‘नंबर वन’ ठरला आहे. काल (ता. २०) एका दिवसात ९८ हजार महिलांनी सवलत योजनेचा लाभ घेतला. परिणामी, नवी सवलत योजना ‘एसटी’साठी संजीवनी ठरणार आहे.
एसटी महामंडळातर्फे राज्यातील ३० घटकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्यात येते. गेल्या काही महिन्यांपूर्वी ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली. आजवर सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभ घेतला. (Latest Marathi News)
या पाठोपाठ राज्य शासनाने महिला प्रवाशांना तिकिटात ५० टक्के सवलत दिली. त्याची अंमलबजावणी सुरू असून, एसटी बसला महिलांची गर्दी वाढू लागली आहे.
‘एसटी’ची राज्यातील एकूण प्रवासी संख्या रोजची ५५ लाखांच्या आसपास आहे. यात ३० टक्के महिला प्रवासी आहेत. उर्वरित १४ ते १६ टक्के महिला या खासगी वाहनाने प्रवास करतात. किंवा प्रवास न करणाऱ्या आहेत. अशा महिला सवलतीमुळे ‘एसटी’ने प्रवास करू लागल्या आहेत.
विशेषतः नोकरी, व्यावसायिक महिला, दीर्घपल्ल्याचा प्रवास करणाऱ्या, तीर्थाटनाला जाणाऱ्या महिला व व्यक्तिगत स्तरावर प्रवास करणाऱ्या महिलांचा योजनेला प्रतिसाद वाढला.
कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, सावंतवाडी, रत्नागिरी या मार्गावर सर्वच बसना महिलांचा प्रतिसाद आहे; तर ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या किंवा जाणाऱ्या महिला नोकरदार व रोजगारदार महिला रोज खासगी वाहतुकीचा आधार घेत होत्या. अशा महिला योजनेमुळे ‘एसटी’कडे वळल्या आहेत.