Kolhapur : पदोन्नती झाली; पण पगारवाढ,नाहीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Police

Kolhapur : पदोन्नती झाली; पण पगारवाढ,नाहीच

कोल्हापूर : पोलिस दलात वर्षानुवर्षे काम केल्यानंतर सहायक फौजदारांना फौजदार (पीएसआय) म्हणून अलीकडेच पदोन्नती दिली. नव्या फौजदाराची छाती फुगली, खांद्यावर वाढीव एक स्टार झळकला, सर्वांनी पदोन्नतीच्या आनंदाने पेढे वाटले; पण त्या पदाचा पगार तर नाहीच, पण नव्या फौजदारांना पोस्टिंगही दिलेले नाही. यातील काही फौजदार फक्त पदोन्नती घेऊनच निवृत्त झाले, काहींची निवृत्ती जवळ आली आहे, अशा परिस्थितीत या फौजदारांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलिस नाईक म्हणून भरती झाल्यानंतर हवालदार, सहायक फौजदार अशी पदोन्नती होते. तीस वर्षे सेवा ज्येष्ठतेनुसारच ही पदोन्नती दिली जाते. तीन महिन्यांपूर्वी याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यातील ३३ जणांना, तर राज्यातील सुमारे चार ते पाच हजार सहायक फौजदारांना फौजदार म्हणून पदोन्नती दिली.

या पदोन्नतीनंतर या फौजदारांच्या डोक्यावर ‘पी कॅप’ आली, खांद्यावर वाढीव ‘स्टार’ झळकले, त्यांचा गणवेशही बदलला; पण पगार मात्र त्या पदाचा मिळत नाही. इतकेच नव्हे तर हे फौजदार ज्या पदावर कार्यरत होते, त्याच पदावर त्यांना कायम ठेवले आहे. त्यांना इतरत्र पोस्टिंगही दिलेली नाही. मग ही पदोन्नती कशासाठी, असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

पोलिस दलात नाईक म्हणून काम करताना अनेकांचे फौजदार बनण्याचे स्वप्न असते. दलात पहिली पाच वर्षे पूर्ण झालेल्यांना खात्यांतर्गत फौजदार परीक्षेला बसता येते, त्यातून काही कर्मचारी फौजदार होऊन आता पोलिस उपअधीक्षक पदापर्यंत पोहचले आहेत; पण ज्यांना ही परीक्षा देणे शक्य नाही, त्यांच्यासाठी खात्यांतर्गत नाईक, हवालदार, सहायक फौजदार ते फौजदार हाच पदोन्नतीचा मार्ग आहे. या नियमानुसार सेवा ज्येष्ठतेनुसार या लोकांना फौजदार म्हणून पदोन्नती मिळाली. त्या आनंदापीत्यर्थ अनेकांनी पेढे वाटले, कोणी आई-वडील तर कोणी पत्नीच्या हातातून खांद्यावर ‘स्टार’ लावले, फौजदाराची टोपी डोक्यावर घालून घेतली; पण आता पदोन्नती होऊन तीन महिने झाले तरी त्यांना या पदाचा पगार तर दूरच, पण त्यांना चांगले पोस्टिंग दिलेले नाही.