esakal | आयुर्वेदिक संरक्षक कापडाची निर्मिती
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : आयुर्वेदिक संरक्षक कापडाची निर्मिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : येथील ‘डीकेटीई’च्या मॅनमेड टेक्स्टाईलमधील अजिंक्य लिमये, सुनील काजवे, निकिता दिगे व स्वाती कराडे या विद्यार्थ्यांनी बहुपयोगी आयुर्वेदिक कापडाची निर्मिती केली आहे. ‘डिझाईन अ‍ॅन्ड डेव्हलपमेंट ऑफ टेक्स्टाईल बेस्ड बॅक्टेरिअल फिल्टर’ या प्रोजेक्ट अंतर्गत वैद्यकीय, आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्रांसाठी वरदान ठरेल, असा फिल्टर विकसित केला आहे.

वाढत चाललेल्या नवनवीन विषाणू - जिवाणूंपासून बचाव व्हावा, या हेतूने या संरक्षक कापडाची (बॅक्टेरिया फिल्टरची) निर्मिती केली आहे. तो मुख्यतः तीन थरांचा बनलेला आहे. फिल्टरचा बाहेरील थर हा पॉलिस्टर, स्पन-बाँड-नॉनवोव्हन फॅब्रिकचा आहे. हा थर प्राथमिक फिल्टरेशनचे आणि जलरोधन आवरणाचेही काम करतो. फिल्टरचा मधला लेअर हा मेल्टब्लोन नॉनव्हेन फॅब्रिकचा आहे. जो त्याच्या उच्च फिल्टरेशन क्षमतेसाठी ओळखला जातो.

सर्वात आतला थर शंभर टक्के बांबू फॅब्रिकचा बनलेला आहे. त्यामध्ये अंतर्भूत प्रतिजैविक गुणधर्म आहेत. त्यावर तुळस आणि नीम यांच्या पानातील अर्कापासून मिळविलेल्या नैसर्गिक बायोसाईडसची प्रक्रिया करून प्रतिजैविक क्षमता वाढवली आहे. हे नैसर्गिक बायोसाईडस कृत्रिम औषधांपेक्षा अधिक प्रतिजैविक क्रिया दर्शवतो. पानांचा अर्क काढण्यासाठी सॉक्सलेट एक्स्ट्रॅक्टरचा वापर केला आहे. विविध प्रकारच्या एकूण सत्तावीस फिल्टरची निर्मिती करून या फिल्टरच्या गुणधर्मांचे ऑप्टिमायझेशन केले. वास्तविक चाचणीसह याची पुष्टी केली आहे. प्रा. आशिष हुल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी या कापडाची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांना डीकेटीई संस्थेचे संचालक प्रा. डॉ. पी. व्ही. कडोले, उपसंचालक प्रा. डॉ. यु. जे. पाटील, प्रा. डॉ. एम. वाय. गुडियावर यांचे मार्गदर्शन लाभले.

कापडाचा उपयोग होणार यासाठी

विद्यार्थ्यांनी विकसित केलेले संरक्षक कापड त्वचेला अनुकूल असून वैद्यकीय क्षेत्रात जसे की मास्क, ड्रेसिंग, संरक्षणात्मक गाउन आदींसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे हे कापड वैद्यकीय क्षेत्रासाठी एकप्रकारे वरदानच ठरणार आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.

loading image
go to top