
कोल्हापूर : राधानगरी धरणावर सुशोभीकरणाला गती
राधानगरी : पर्यटनमंत्र्यांच्या राधानगरी दौऱ्यामुळे रखडलेल्या मांजर खिंड आणि राधानगरी धरण चौक (जंक्शन) सुधारणा व सुशोभीकरण कामाने आता गती घेतली आहे. निधीअभावी तब्बल दोन वर्षांपासून हे काम अपूर्ण आहे. उर्वरित कामासाठी निधीचा प्रस्ताव कागदावरच राहिल्याने काम ठप्पच राहिले, मात्र धरण पायथ्याशी उभारलेल्या राजर्षी शाहू माहिती केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा निश्चित झाला. पर्यटनमंत्री कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या राज्य मार्गावरच चौक सुधारणा कामे प्रस्तावित आहेत. यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून निधीची तरतूद झाली आहे. त्यामुळे अपूर्णावस्थेत राहिलेली कामे पर्यटनमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच म्हणजे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.
आमदार प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सुशोभीकरणाचे काम प्रस्तावित झाले. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून जवळपास एक कोटीचा निधी मंजूर झाला. पहिल्या टप्प्यात २० लाखांचा निधी उपलब्ध झाला, मात्र ४० टक्के काम पूर्ण झाल्यानंतर निधीची कमतरता कायम राहिली. ठेकेदारांनी
काम बंद केले अपूर्णावस्थेत राहिलेले काम पूर्णत्वास जाण्यास पर्यटन मंत्र्यांचा राधानगरी दौरा कामी आला आहे. बाकी कामासाठीचा निधी लवकरच मिळण्याचे संकेत यंत्रणेने दिले आहेत.
पर्यटकांचे आकर्षण
पर्यटकांची वर्दळ असणाऱ्या आणि अभयारण्य हद्दीवरील, काळम्मावाडी धरण स्थळाला जोडणाऱ्या रस्त्यावरील मांजरखिंड, राधानगरी धरण स्थळाला राज्यमार्गापासून भिडणाऱ्या रस्त्यावरील मोक्याच्या ठिकाणी चौकांची सुधारणा व सुशोभीकरण पर्यटकांचे नवे आकर्षण ठरणार.
‘सकाळ’चा पाठपुरावा
चौक सुशोभीकरणाच्या रेंगाळलेल्या या कामावर ‘सकाळ’ने सातत्याने प्रकाशझोत टाकला. अखेर मंत्री ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे याला गती आल्याने रेंगाळलेले हे काम मार्गी लागले आहे.
Web Title: Kolhapur Radhanagari Dam Tourism
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..