esakal | कोल्हापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस; शहरवासीय झाले चिंब

बोलून बातमी शोधा

कोल्हापुरात  सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस: शहरवासीय झाले चिंब
कोल्हापुरात सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस: शहरवासीय झाले चिंब
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर: कोल्हापूर शहर परिसरात आज सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दुपारी तीनपर्यंत तब्बल 36-37 डिग्रीमध्ये असलेल्या उन्हानंतर अवघ्या अर्ध्यातासांत ढगाळ वातावरण होऊन झालेल्या पावसाने कोल्हापूरकरांना चिंब केले. वळीवाच्या पावसाने रस्त्यांवर होती-नव्हती तीही वाहतूक बंद झाली. या सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेला पावसामुळे मात्र कोणती ही हानी झाल्याची नोंद झाली नाही.

सकाळी नऊ-साडेनऊ पासून टळटळीत उन्हाने कोल्हापूर तापले होते. रस्त्यांवरील वाहतूक ही कमी होत आली होती. दुपारी बारा साडेबारा ते तीन साडेतीनपर्यंत उन्हाचा चटका जाणवत होता. मात्र चार-साडेचारच्या सुमारास ढगाळ वातावरण झाले. वारे जोराने वाहू लागले. उपनगरासह शहरातील प्रमुख मार्गावरून होती-नव्हती तीही वाहतूक बंद झाली. साडेचार-पाच दरम्यान पावसाचे टपोरे थेंब कोसळू लागले. पाहतापाहता गारांचाही वर्षाव सुरू झाला. अवघ्या पंधरा-वीस मिनिटांत पावसाने उन्हाच्या चटक्‍याचे परिवर्तन थंड हवेत गेले.

कोल्हापूरकरांना पावसाने चिंब केलेच, पण सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी भितीचेही वातावरण निर्माण झाले. काही परिसरात वीज खंडीत केली होती. तर काही ठिकाणी वाहनधारक पेट्रोल पंपासह मिळेल त्या आडोशाला उभे असल्याचे दिसून आले. साधारण साडेपाचपर्यंत हा पाऊस पुन्हा शांत झाला. ऊन पावसाचा अनुभव काही ठिकाणी आला तर काही ठिकाणी जोरदार पावसाने गारवा जाणवला. साडेपाच नंतर मात्र पुन्हा पावसाचे वातावरण निवळले. सोसाट्याचा पाऊस असला तरी कोठेही नुकसान, हानी झाली नसल्याचे अग्नीशमन दलाकडून सांगण्यात आले.

Edited By- Archana Banage