
Kolhapur : राधानगरी धरणस्थळी जागर
राधानगरी : राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कार्य आदर्शवत आहे. जयंतीच्या निमित्ताने हे आदर्श कार्य देशभर पोहोचवणे हेच ध्येय आहे, असे शाहू ग्रुपचे अध्यक्ष व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी सांगितले.
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या अथांग कार्याचे प्रतीक असलेल्या धरणस्थळी त्यांची १४८ वी जयंती झाली. यावेळी ते बोलत होते. मुसळधार पावसात शाहूभक्तांच्या उपस्थित कार्यक्रम झाला.
राधानगरी धरणातील जलपूजन करून वाद्यांच्या गजरात बारा बलुतेदारांसोबत त्यांनी जलकलश जयंतीस्थळापर्यंत आणले. त्यांच्यासह राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा नवोदिता घाटगे, राधानगरी परिसरातील बारा बलुतेदार जोडप्यांच्या हस्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यास विधिवत जलाभिषेक घातला. या पुतळ्याचे पूजन श्री व सौ. घाटगे यांनी केले. निसर्गमित्र सुभाष पाटील यांचा घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला. शाहीर दिलीप सावंत यांचा शाहू महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा झाला. तसेच, शिवछत्रपती मर्दानी आखाड्याच्या तरुणांनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकेही सादर केली.
जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष संभाजी आरडे, राधानगरीच्या सरपंच कविता शेट्टी, फेजीवडेचे सरपंच फारुख शानेदिवाण, डिक्कीचे प्रसन्न भिसे, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, बाबासाहेब पाटील, नाथाजी पाटील, भगवान काटे, प्रकाश पाटील, सचिन मगदूम आदी उपस्थित होते.
डिक्की पुणे, शाहू ग्रुप व राजे बँकेच्या माध्यमातून सांगाव येथील अशोक कांबळे यांनी मेक इन कोल्हापूर या उपक्रमांतर्गत दोन टँकर घेतले आहेत. यावेळी धरणस्थळी त्यांना या टँकरच्या चाव्या सुपूर्द केल्या. लवकरच राधानगरीत बँकेची शाखा स्थापन करण्याची घोषणा घाटगे यांनी केली.
Web Title: Kolhapur Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..