कोल्हापूर-सांगली महामार्ग सुरू; उदगाव टोल नाक्याजवळ पाणी कमी

कोल्हापूर-सांगली महामार्ग सुरू; उदगाव टोल नाक्याजवळ पाणी कमी

जयसिंगपूर (कोल्हापूर) : उदगाव टोल नाक्याजवळ पाणी कमी झाल्याने कोल्हापूर-सांगली महामार्ग मंगळवारी सकाळी वाहतुकीस खुला करण्यात आला. जेसीबीच्या साहाय्याने चाचपणी करून वाहतूक सुरू झाली. शनिवारपासून (ता. २४) टोल नाक्याजवळ रेल्वे ओव्हर ब्रिजखाली पाणी आल्याने मार्ग वाहतुकीस धोकादायक बनल्याने बंद केला होता. शनिवारपासून विविध राज्यातील अवजड वाहतूक करणारी वाहने महामार्गावर थांबून होती. चालक-वाहकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात होती. मंगळवारी सकाळी वाहतूक सुरू झाल्याने ही वाहने मार्गस्थ झाली. रात्रीत सुमारे सात ते आठ फूट पाणी ओसारल्याचा अंदाज आहे. इंधन, गॅस, ऑक्सिजन, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू झाली.

राधानगरी धरणाचे चार दरवाजे बंद

राधानगरी धरणाच्या उघडलेल्या पाचपैकी चार स्वयंचलित दरवाजे आज बंद झाले. त्याने दिलासा मिळाला. दुसरीकडे, पंचगंगेची पातळी कमी होत आहे. इचलकरंजीतील पाणी पातळी अर्ध्या फुटाने घटली. शिरोळमध्येही पातळीत घट आहे. पुणे-बंगळूर महामार्गाच्या दोन्ही मार्गिकांवरून वाहतूकही सुरू झाली. शहरातील बालिंगा उपसा केंद्र रात्री अकरा वाजता सुरू झाले. त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला.

कोल्हापूर-सांगली महामार्ग सुरू; उदगाव टोल नाक्याजवळ पाणी कमी
उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरमध्ये दाखल

पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची पातळी सायंकाळी सहाला ४७ फूट आठ इंच इतकी होती. गेल्या १२ तासांत ती एक फुटाने कमी आली. जिल्ह्यातील ७४ बंधारे पाण्याखाली आहेत. शहरात पेट्रोल-डिझेलचे टॅंकर आल्याने इंधन विक्री खुली झाली. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम वेगाने सुरू झाली आहे. जिल्ह्यात सुमारे दीड लाख व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले. कालपर्यंत ९० गर्भवती महिलांना स्थलांतरित केले होते. त्यापैकी चार जणींची प्रसूती आज सुखरूप झाली आहे.

दरम्यान, गगनबावडा येथील भुईबावडा घाट, करूळ घाट वाहतुकीस पूर्ण बंद आहे. गगनबावडा ते कळे रस्ता खुला झाला. शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यांत स्थलांतरित पूरग्रस्तांच्या मदतकार्याला गती आली आहे. महापुरामुळे कोल्हापुरात येण्याचे सर्वच मार्ग बंद झाले होते. महामार्ग खुला झाल्याने वेशीवर तटून असलेल्या ३० पेट्रोल-डिझेल टॅंकरना शहरात प्रवेश मिळाला. पाणीपुरवठ्यासाठी आलेले टॅंकरही शहरात आले.

राधानगरी धरणाचे तीन दरवाजे दुपारी बंद झाले. विसर्गही कमी झाला आहे. जिल्ह्यासह धरणक्षेत्रात पावसाने उघडीप दिली. दानोळी (ता. शिरोळ) येथील सुमारे १७० पूरग्रस्तांना तेथील शाळेत विस्थापित केले. जयसिंगपूर परिसरातील मौजे कवठेसार येथील पुराचे पाणी कमी झाले असले, तरीही दानोळी, उदगाव येथे पाणी आहे. ते कमी झाल्यावरच कोल्हापूर-सांगली मार्गातील उदगाव येथील रेल्वे पुलाजवळील वाहतुक खुली होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com