Kolhapur : गुप्तधन असं काय नसतं भाऊ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Kolhapur : गुप्तधन असं काय नसतं भाऊ!

कोल्हापूर : धनसंपत्ती ठेवण्यासाठी नव्या काळात अनेक पर्याय आहेत. गुप्तधन ठेवण्याची ऐपत सर्वसामान्यांची असत नाही. तरीही घरात गुप्तधन ठेवल्याच्या बाता मारणे किंवा अशा गुप्तधनाच्या हव्यासापोटी काही गुन्हेगारी कृत्ये करणे हा प्रकार अंधश्रद्घेला खतपाणी घालणारा आहे. अशा अंधश्रद्धा रोखल्या जाव्यात यासाठी शिक्षण व प्रबोधनातून प्रत्येक व्यक्तीमध्ये वैचारिक व विज्ञानवादी दृष्टिकोन व्यापक करण्याची गरज आहे, असा सूर अंधश्रद्धा निर्मूलन व सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द गावात शहरात राहणाऱ्या एका महिलेचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. पोलिस तपासात गुप्तधनाच्या आमिषाने खून झाल्याची माहिती पुढे येत आहे. यानिमित्ताने अद्याप गुप्तधनासारख्या विषयात सर्वसामान्य व्यक्तीमध्ये अंधश्रद्धा कशी असू शकते, याअनुषंगाने उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत; मात्र अशा अंधविश्वासातून एखाद्या गोष्टींच्या मागे लागणे, कळत न कळत किंवा जाणीवपूर्वक गुन्हेगारी कृत्य करणे ही बाब सामाजिक स्वास्थ्याला बाधा आणणारी असल्याचे मत चळवळीतील कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य करणाऱ्या घटकांशी संवाद साधला असता. समाजातील शिक्षित वर्गाच्या तुलनेत अल्पशिक्षित वर्गात अशी अंधश्रद्धा जास्त दिसते. व्यक्तीगत पातळीवरील आर्थिक विवंचना, कर्ज बाजारीपणा, व्यसनाधीनता, महिलांचे हिरावलेले स्वातंत्र्य, सतत येणारे अपयश आदी कारणाने नैराश्य येते तेव्हा काहीजण बुवा बाबांकडे जाऊन उपाय शोधतात. याच वर्गातील काही मोजके अक्षरश: हतबल झालेले असतात. यात महिलांचे प्रमाण अधिक असते. अशा व्यक्ती अंधश्रद्धेवर विश्वासात ठेवण्याची शक्यता वाढते. यात काही मोजके गुप्तधन असू शकेल, असा अंदाज खरा मानतात. अशा व्यक्तींच्या हातून काही दुष्‍कर्म घडू शकते.

अंधश्रद्धेची ठळक कारणे

महिलांना स्वातंत्र्याचा अभाव, पुरुषांची आर्थिक दुर्बलता, सन्मान नसणे आदी बाबींतून लोक अंधश्रद्धेकडे वळवतात. अशा व्यक्तीत खरे-खोटे करण्याच्या वृत्तीचा अभाव असतो. यातून एखाद्या गुप्तधनाच्या काल्पनिक गोष्टीवरही ते विश्वास ठेवतात. महिलांमध्ये एचबीचे प्रमाण कमी असणे, मेंदूला रक्तपुरवठा होत नसल्यास मानसिक आरोग्याची समस्या निर्माण होते. यातूनही काही महिला अंधश्रद्धाळू बनतात.

अंधश्रद्धेच्या प्रकारांना वेळीच रोखण्यासाठी उपाय आहेत. अशा हवालदिल व्यक्तींचे वेळीच समुपदेशन करणे, त्यांना रोजगाराचे महत्त्‍व पटवून देणे, कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाही. गुप्तधन वैगरे या गोष्टींचा इतिहास झाला. वास्तविक युगात सर्वसामान्य व्यक्तींच्या घरात असे धन साठवणे अशक्य आहे. याचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. याची सुरुवात शालेय विद्यार्थ्यांपासून केल्यास नवी पिढीही अंधश्रद्धेपासून वेळीच दूर होईल. गुन्‍ह्याच्या प्रकाराला त्यातून काही प्रमाणात आळा बसेल.

-सीमा पाटील, जिल्हाध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती