Gudi padwa 2023 : सातशे महिलांनी उभारली उद्योगाची गुढी Kolhapur Seven hundred women set up cradle industry | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gudi padwa

Gudi padwa 2023 : सातशे महिलांनी उभारली उद्योगाची गुढी

कोल्हापूर : घर, संसाराची जबाबदारी सांभाळत कोल्हापूर जिल्ह्यातील ७०० महिलांनी गेल्या दोन वर्षांत उद्योगाची गुढी उभारली आहे. पंतप्रधान रोजगार निर्मिती (पीएमईजीपी) आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा (सीएमईजीपी) आधार त्यांनी घेतला.

रेडिमेड गारमेंट ते वाहनांच्या सुटे भाग निर्मितीपर्यंतच्या विविध उद्योगांचा त्यात समावेश आहे. त्यांनी याद्वारे महिला सक्षमीकरणासह रोजगारनिर्मितीला नुसते बळ दिले नाही, तर राज्यातील अव्वल पाच जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरला आघाडी मिळवून दिली आहे.

कोरोनाने लोकांच्या जगण्याचे संदर्भ बदलून टाकले. अनेकांनी विविध लहान-लहान उद्योग, व्यवसायांची सुरुवात केली. त्यात महिला आघाडीवर राहिल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत एकूण एक हजार ७६१ नव्या उद्योगांची उभारणी झाली. त्यात महिलांनी रेडिमेड गारमेंट, ब्यूटीपार्लर, फूड प्रोसेसिंग, टेक्स्टाईल,

मसाला उत्पादन, फॅशन डिझायनिंग, टेलरिंग, काजू आणि लोणचे उत्पादन, वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणे अशा विविध ७०० उद्योग आणि सेवा देणाऱ्या उद्योगांची सुरुवात केली आहे. त्यात गेल्या वर्षी ४००, तर यंदा आतापर्यंत ३०० महिलांनी नव्या उद्योगांची उभारणी केली. या दोन्ही योजनांमध्ये २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदान, ५ ते १० टक्के स्वतःचे भांडवल आणि उर्वरित कर्जपुरवठा बँकेकडून होत असल्याने उद्योग उभारणीची गती वर्षागणिक वाढत आहे.

सुमारे १५ कोटींचे अनुदान

उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीला बळ देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पीएमईजीपी आणि सीएमईजीपी योजनांची सुरुवात केली. यात शहरातील महिलांना २५ टक्के आणि ग्रामीण भागातील महिलांना ३५ टक्के अनुदान दिले जाते.

कर्जमंजुरीची पात्रता, अटींची पूर्तता करण्याची प्रक्रिया सोपी आहे. त्यामुळे संबंधित योजनांच्या माध्यमातून उद्योग उभारणी करणाऱ्या महिलांचे प्रमाण वाढत आहे. या अंतर्गत उद्योग उभारणी केलेल्या नवउद्योजकांना एकूण सुमारे १५ कोटींचे अनुदान शासनाने दिले आहे. प्रकरण मंजूर आणि अनुदान देण्यात कोल्हापूर हे राज्यातील पाच अव्वल जिल्ह्यांमध्ये आघाडीवर असल्याचे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचे स्वप्न होते. ‘सीएमईजीपी’च्या माध्यमातून ते सत्यात आणले. गेल्या दोन वर्षांपासून वाहनांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या उद्योगाची उभारणी केली. महिलांचा उद्योग क्षेत्रातील टक्का वाढविण्यासाठी शासनाच्या कर्जपुरवठा आणि प्रशिक्षणाच्या विविध योजना आहेत. त्याचा लाभ महिलांनी घ्यावा.

- पूजा पाटील, शिरोली एमआयडीसी

कोल्हापूर अव्वलस्थानी

पीएमईजीपी योजनेंतर्गत उद्योग उभारणीत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. त्यानंतर सोलापूर, नाशिक, नागपूर, रत्नागिरी जिल्ह्यांचा क्रम आहे. सीएमईजीपीमध्ये कोल्हापूरपाठोपाठ नाशिक, पालघर, अमरावती, धाराशिव, अकोला हे जिल्हे आहेत.

फूड प्रोसेसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगांना लागणाऱ्या पुलीनिर्मितीचा स्टार्टअप मी दोन वर्षांपूर्वी सुरू केला. त्याला मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती योजनेतून कर्जपुरवठा झाला. जिल्हा उद्योग केंद्राची चांगली मदत झाली. महिलांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उद्योग क्षेत्रात पाऊल टाकावे.

- श्रुती लाटणे, उद्यमनगर