Kolhapur : ऋतू संधिकालात आहार, दिनचर्येत बदल करून राहा निरोगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur

Kolhapur : ऋतू संधिकालात आहार, दिनचर्येत बदल करून राहा निरोगी

उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या ऋतुचक्राप्रमाणे आजारदेखील बदलत असतात. या ऋतु बदलाप्रमाणे योग्य काळजी घेतली, तर आजारपण सहसा येत नाही. ऋतूप्रमाणे दिनचर्येत आणि आहारात बदल केला तर प्रत्येक ऋतू सुसह्य होतो. ऋतूनुसार हवामानात होणारा बदल प्रत्येक व्यक्तीवर काही ना काही परिणाम करत असतो. रुग्णांची प्रतिकारशक्ती, त्याची दिनचर्या, त्याची प्रकृती (वात, कफ व पित्त) यानुसार आजारही बदलतात. प्रतिकारशक्ती चांगली असल्यास ऋतूबदलाचा विशेष त्रास होत नाही. प्रत्येक ऋतु बदलताना १५ दिवसांचा ‘ऋतुसंधिकाल’ असतो. या काळात अनेकजण आजारी पडल्याचे दिसते. ‘व्हायरल’ आजारपण आहे, असे म्हणून अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र या काळात आहारात काही बदल केल्यास निश्चितच असे आजारपण टाळता येणे शक्य आहे.

शिशिर ऋतू

या ऋतूमध्ये प्रामुख्याने थंडीचे दिवस सुरू झालेले असतात. या वेळी कफाशी संबंधित आजार डोके वर काढतात. सर्दी, खोकला, दम्याच्या तक्रारी जाणवतात. या काळात कडू, तिखट, तुरट आणि उष्ण पदार्थ खाल्यास बराच फरक पडतो. पडवळ, मेथी, कारले, सुंठ यांचा समावेश आहारात करावा. दिवसा झोपू नये.

ग्रीष्म ऋतू

कडाक्याचे ऊन ग्रीष्म ऋतूत पडते. या ऋतूमध्ये रसदार फळे, भाज्यांचा आहारात समावेश करावा. द्राक्षे, लिंबू, डाळिंब, शहाळे यांचे सेवन करावे. कोकम सरबत प्यावा. हरभरा, पावटा असे पित्त वाढवणाऱ्या गोष्टींचा आहारात समावेश करू नये. पित्त वाढविणारे पदार्थ टाळावे.

वर्षा ऋतू

जुलै - ऑगस्ट महिन्यात हा ऋतु येतो. या दरम्यान वात प्रकोप होतो. पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे या काळात हलका आहार घ्यावा. मूगभात, खिचडी- तूप, भाज्यांचे सुप या पदार्थांचा आहारात समावेश करा.

शरद ऋतू

या काळात पित्त प्रकोप वाढतो. त्यामुळे पित्त शमविणारे पदार्थ खावेत. दूध, तूप, लोणी, साखर, आवळ्याचे सरबत आणि कोकम सरबत घ्यावे.

हेमंत ऋतू

या ऋतूत थंडी असते. पचनशक्तीही चांगली असते. व्यायाम सुरू करण्यासाठीही हा

उत्तम काळ असतो. यामुळे दूध-दुग्धजन्य पदार्थ मोठ्या प्रमाणावर घ्यावेत. जड पदार्थ खाल्ले तरी पचतात.

ऋतू बदल होताना १५ दिवसांचा संधिकाळ असतो. या काळातच प्रकृतीची काळजी घेतल्यास आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. आहार व दिनचर्येत थोडेसे बदल करून या काळातही निरोगी राहता येते.

- अनिकेत पाटील,एम. डी. आयुर्वेद