
कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचे मतदारसंघ प्रारूप आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रसिद्ध केले. नवीन रचनेत जिल्हा परिषदेचे नऊ मतदारसंघ वाढले आहेत. त्यामुळे ही संख्या आता ६७ वरून ७६ झाली आहे. पंचायत समितीच्या सदस्यांची संख्याही १३४ वरून १५२ झाली. यातही १८ मतदारसंघांची वाढ झाली आहे. या प्रभाग रचनेवर आठ जूनपर्यंत हरकती घेता येणार आहेत. हातकणंगले तालुक्यातील प्रभाग प्रारूप निश्चित करताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी केला आहे. त्यामुळे या तालुक्यातून सर्वाधिक हरकती येण्याची शक्यता आहे. प्रभाग प्रारूप निश्चित झाल्याने राजकीय समीकरणांना गती येईल.(Kolhapur Jilha Parishad News)
जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत २० मार्च रोजी संपली; मात्र ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाल्याने राज्य शासनाने निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितींवर प्रशासक नेमण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण फेटाळत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. एका बाजूला आरक्षणाची लढाई सुरू असतानाच निवडणुकीचे कामही सुरू झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग प्रारूप प्रसिद्ध झाल्यानंतर राजकीय उलथापालथ सुरू झाली आहे. नवीन प्रभाग रचनेत जिल्हा परिषदेच्या मतदारसंघांची फेररचना झाली आहे. नऊ प्रभाग वाढवण्यात आले आहेत, मात्र हे करत असताना राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप आमदार आवाडे यांनी केला. विरोधक म्हणून त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष होत असतानाच महाविकास आघाडीचे एक नेते माजी आमदार चंद्रदीप नरके यांनीही याबाबत आरोप केल्याने वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. नवीन प्रभाग रचनेवर
हरकती घेण्याची मुदत आठ जूनपर्यंत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून (ता.३) हकरती दाखल होणार आहेत. जिल्हा परिषदेचे नऊ मतदारसंघ वाढले असले तरी बहुतांश मतदारसंघातील गावांमध्ये बदल झाला आहे. त्यामुळे इच्छुकांनी चाचपणी सुरू केली आहे. कोणते गाव सोयीचे, कोणते अडचणीचे, विरोधी गावात कशी यंत्रणा लावायची याबाबत आतापासूनच जोडण्या सुरू झाल्या आहेत.
पाच तालुक्यांत जैसे थे
भुदरगड, आजरा, चंदगड, गडहिंग्लज, तसेच गगनबावडा तालुक्यात एकही मतदारसंघ वाढलेला नाही; मात्र गावांमध्ये बदल झाला आहे. हातकणंगले तालुक्यात मोठा बदल झाला आहे.
दृष्टिक्षेपात
२ ते ८ जून कालावधीत हरकती
२२ जूनला अंतिम प्रभाग रचना
२७ जूनला अंतिम प्रभाग रचना प्रसिद्धी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.