esakal | साहित्यिक महादेव मोरे यांना डी. लिट. ने गौरवावे
sakal

बोलून बातमी शोधा

साहित्यिक महादेव मोरे

साहित्यिक महादेव मोरे यांना डी. लिट. ने गौरवावे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कारदगा : निपाणी येथील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक महादेव मोरे यांना डी. लिट. पदवीने गौरविण्यात यावे, असा प्रस्ताव कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे शिवाजी विद्यापीठास देण्यात आला. मंगळवारी (ता. ५) कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांची भेट घेऊन या उपेक्षित साहित्यिकास योग्य सन्मान देण्यासह सीमाभागातील मराठी साहित्य चळवळीबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली.

कुलगुरूंना दिलेल्या प्रस्तावातील माहिती अशी, मराठी साहित्यात महादेव मोरे यांचे लेखनकार्य अनमोल आहे. उच्चविद्याविभूषित नसताना, उभे आयुष्य पीठाची गिरण चालवून हयात त्यांनी लेखनकार्यासाठी घालविली आहे. त्यांची लेखन प्रतिभा खूपच व्यापक आहे. समाजातील दुर्लक्षित व्यक्ती आणि प्रसंग त्यांनी शब्दबध्द केले आहेत. सुमारे साठ वर्षे त्यांनी केलेला लेखन प्रपंच आदर्शवत आहे. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीत समाजाप्रती संवेदनशीलता, निरीक्षण आणि संशोधनवृत्ती खूपच अभ्यासपूर्ण आहे. तब्बल 15 कथासंग्रह, 18 कादंबरी आणि प्रासंगिक लेख यातून अनुभवसिध्दता स्पष्ट होते. तसेच त्यांच्या साहित्यावर तिघांनी पीएच. डी. व सात जणांनी एम. फील. पदवी संपादन केली आहे.

हेही वाचा: Delhi: प्रदूषण रोखण्यासाठी केजरीवालांचा दहा कलमी कार्यक्रम

महादेव मोरे यांच्या साहित्यकृतीस महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र साहित्य परिषद यांचे अनेक पुरस्कार लाभले असून महाराष्ट्र फौंडेशननेही गौरव केला आहे. अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. विद्यापीठ स्तरावरच्या अभ्यासक्रमात त्यांच्या साहित्याचा समावेश आहे. या साहित्यिकाचा आपणाकडून सन्मान होणे म्हणजे अखंड मराठी साहित्यविश्वाचा सन्मान झाल्यासारखे आहे. शिवाय नवोदितांना आणि साहित्यप्रेमींना प्रोत्साहन आणि प्रेरणाही मिळेल. तरी महादेव मोरे यांना डी. लिट. ( Doctor of Literature ) ही पदवी मिळावी व विद्यापीठ स्तरावर त्यांचा गौरव व्हावा.

यावेळी साहित्य विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश काशीद, उपाध्यक्ष सुनीता कोगले, देवचंद महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. रमेश साळुंखे, सुभाष ठकाणे, बाळासाहेब नाडगे, भाऊसाहेब चिंदके, महादेव दिंडे, तुकाराम गुणके, अंकुश वाडकर उपस्थित होते. निपाणी येथे सर्वांनी महादेव मोरे यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. डी. लिट. पदवीचा प्रस्ताव देवून दखल घेतल्याने भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

loading image
go to top