esakal | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या 150 कथामध्ये महिला नायक; अभ्यासातील निष्कर्ष
sakal

बोलून बातमी शोधा

birthday of Lokshahir literature Annabhau Sathe special story contribution of the film industry

अण्णा भाऊ साठे यांच्या 150 कथामध्ये महिला नायक

sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (Lokshahir Anna Bhau Sathe jayanti 2021) यांच्या १३ कथासंग्रहातील दीडशे कथांत महिलांना नायकत्व दिले आहे. त्यात तिच्या खास अनुभवाच्या भाषेची मांडणी केली असून, पारंपरिक संस्कृतीची चौकट मोडून साहित्यातून आलेली महिलेची पौराणिक रूढ प्रतिभा नाकारली आहे. पुरुष व महिला यांना समान पातळीवर ठेवून महिलानिष्ठ संहिता व अनुभवांना प्राधान्य दिले आहे. हा निष्कर्ष महागाव (ता. गडहिंग्लज) येथील राजा शिवछत्रपती कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुकुमार आवळे (Sukumar aavale) यांच्या अभ्यासातील आहे.

डॉ. आवळे अण्णा भाऊ साठे यांच्या जीवन चरित्राचे अभ्यासक आहेत. ते मूळचे कबनूरचे (इचलकरंजी) आहेत. त्यांचे आर्ट्स, कॉमर्स सायन्स महाविद्यालयातून पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. जयसिंगपूर महाविद्यालयातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर रत्नागिरीत बी.एड. केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून त्यांनी एम.फिल. केले. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. एम. फिल.ला त्यांनी ‘अण्णा भाऊ साठे यांच्या कथांचे स्त्रीवादी पुनर्वाचन व चिकित्सा’ विषयावर विशेष अभ्यास केला. त्यातून साठे यांनी रस्त्यावरील महिलेला नायकत्व दिल्याचे निरीक्षण नोंदवले आहे.

विशेष म्हणजे या महिला विविध जातींमधील आहेत. डॉ. आवळे यांनी केलेल्या विशेष अभ्यासात अण्णांच्या कथांतील महिला नायिका धाडसी, बेडर, स्वाभिमानी असून त्यांनी प्रेम कथेतही महिलांचा सन्मान केल्याचे म्हटले आहे. कथांची शैली प्रस्थापित मराठी कथेपेक्षा वेगळी असून, ती वास्तव स्वरूपाची व बुद्धीला पटणारी आहे. त्यांच्या कथांतील भाषाशैली ओघवती, आटोपशीर, आकर्षक, खटकेबाज, तडफदार, ओझस्वी आहे. नीतिभ्रष्ट व विश्वासघाती पतीला धडा शिकवून लढाऊपणे संघर्षसंपन्न जीवन जगणाऱ्या आहेत, असा असल्याचा निष्कर्ष आवळे यांनी मांडला आहे. तत्कालीन स्थितीचा वेध घेता अण्णांनी थेट रस्त्यावर लढणाऱ्या महिलांचे जिवंत चित्रण केल्याचे त्यांनी म्हटले आहे.

अण्णांच्या साहित्याची दखल म्हणावी तशी घेतली गेली नसली तरी त्यांची जयंती व पुण्यतिथीनिमित्त गावागावांत अभिवादन केले जाते. त्यांचे साहित्य केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते. समाजाप्रती असलेली कणव त्यांच्या साहित्यातून व्यक्त होते. नव्या पिढीने त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

- प्रा. डॉ. सुकुमार आवळे

loading image