esakal | Video - कष्टाच्या कामाने आयुष्य बनविले सुंदर

बोलून बातमी शोधा

Video - कष्टाच्या कामाने आयुष्य बनविले सुंदर
Video - कष्टाच्या कामाने आयुष्य बनविले सुंदर
sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : पाठीवर 50 किलोचं पोतं उचलणं अवघड काम. एक टन पोती ट्रकमध्ये भरल्यानंतर हातावर साडेतीनशे रुपये मजुरी मिळते. ही रोजची माथाडी-हमाल कामगारांची कामाची स्थिती. संचारबंदीचा फारसा बाऊ न करता यांचं काम सुरू आहे. शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, करवीर तालुक्‍यातले हे कामगार मार्केट यार्डातच तळ ठोकून आहेत. अडत दुकानांच्या परिसरात त्यांची रात्री जेवण बनविण्याची लगबग सुरू होते आणि रात्रीच्या गप्पांत त्यांचा दिवसभराच्या कामाचा ताण हलका होतो.

माथाडी कामगारांच्या वर्षानुवर्षांच्या मागण्या प्रलंबित आहेत. त्यासाठी कामगार एकत्र येतातही. आज ना उद्या त्या सुटतील, ही त्यांची भाबडी आशा; पण त्याच्या जास्त खोलात न जाता त्यांचं रोजचं जगणं सुरू आहे. संचारबंदीतही त्यांच्या कपाळाला आठ्या पडताना दिसत नाहीत. अडत मालकाने बोलवायचा अवकाश; त्याच्या दुकानासमोर थांबलेल्या ट्रकमध्ये भराभरा ते माल चढवतात, तितक्‍याच वेगाने उतरवतात.

पाच दिवस संचारबंदी सुरू असली तरी या काळातले हे चित्र आजही कायम आहे. डोक्‍यावर चुंबळ, पाठीवर रुमाल व हातात टोच्या घेऊन ते दुकानांत काम करतात. यातील काही कामगार गावाहून ये-जा करणारे तर काही येथे मुक्कामालाच आहेत. कोल्हापूर माथाडी आणि जनरल कामगार युनियनमध्ये यांची नोंद साडेतीन हजारांवर आहे. कांदा, बटाटा, गूळ, भाजीपाला, धान्य दुकानात त्यांचे काम चालते. 20 ते 25 वर्षे याच व्यवसायात असणारे अनेक कामगार येथे आहेत. ट्रकमध्ये माल कधी भरावा लागेल व कधी उतरवावा लागेल, याच्या वेळा निश्‍चित नाहीत. त्यामुळे सकाळी आठला सुरू झालेले काम रात्री नऊपर्यंत सुरूच असते. टाइम टेबलमध्ये काम करण्याची सवय कामगारांना राहिलेली नाही. दुपारी जेवण झाल्यानंतर तासभर अंग जमिनीवर टेकायचे.

पुन्हा कपभर चहा पोटात ढकलायचा आणि कामाला जायचे. सायंकाळी सूर्य मावळतीला लागला असताना यांच्या पाठीवर पोत्यांच्या राशीच्या राशी वाहून नेण्याचे काम सुरू असते. एक कामगार दिवसभरात किमान शंभर पोती उचलण्याचे काम करतो, असे महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियनचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आकाराम केसरे सांगतात. कामगारांना भलेही कमी मजुरी मिळते; मात्र शासकीय नियमांचे पालन करण्यास ते चुकत नाहीत. तोंडाला मास्क लावतात. पोती उचलताना श्वास घेण्यात अडथळा येत असल्याने त्यांना तो नाकावरून खाली घ्यावा लागतो, असेही ते स्पष्ट करतात.

"कोरोनामुळे अनेकांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. साऱ्या जगभरच कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. त्यामुळे आपण का थांबायचे, हा प्रश्न आहे. काम असेल त्यावेळी करायचे, नसेल त्यावेळी आनंदाने जगायचे, हे शिकले पाहिजे. एखादी परिस्थिती कशी हाताळायची हे कळाले की, जगणे सोपे होते."

- प्रकाश लवटे, माथाडी कामगार