वीस दिवसांत आमदार झालेले आण्णा

प्राबल्य असलेल्या कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचा उमेदवार कोण?
kolhapur
kolhapuresakal
Summary

प्राबल्य असलेल्या कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचा उमेदवार कोण? हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. बऱ्याच नावांची चर्चा झाली. त्यात जाधव यांचे नाव आघाडीवर होते.

दोन वर्षापूर्वी विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली, त्याच दरम्यान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पालकमंत्री सतेज पाटील यांची वर्णी लागली होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेसचा पराभव झाला होता. अशा परिस्थितीत काँग्रेसला उभारी मिळवून देण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर होती. त्याचवेळी त्यांचे प्राबल्य असलेल्या कोल्हापूर उत्तरमधून काँग्रेसचा उमेदवार कोण? हा मोठा प्रश्‍न त्यांच्यासमोर होता. बऱ्याच नावांची चर्चा झाली. त्यात जाधव यांचे नाव आघाडीवर होते. पण, अडसर होता तो त्यांच्या पत्नी, भाऊ भाजपचे नगरसवेक असल्याचा. त्यावरही मार्ग निघाला आणि विधानसभेला २० दिवसांचा कालावधी असताना त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचे नावही उमेदवारीसाठी निश्‍चित झाले. अवघ्या २० दिवसांत पायाला भिंगरी बांधून जाधव शहरातून फिरले आणि आमदारही झाले. त्यांच्या रूपाने अस्सल कोल्‍हापुरी बाण्याचे व्यक्तिमत्त्व विधानसभेत पोहचले. किंबहुना हा बाणा असल्यानेच आपण आमदार झाल्याची प्रतिक्रियाही त्यांनी विजयानंतर ‘सकाळ’ला दिली होती.

आमदार जाधव यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले आणि त्यांच्या विधानसभेच्या तिकिटापासून ते आमदार होईपर्यंतचा आणि गेल्या दोन वर्षातील कारकिर्दीचा सारिपाट डोळ्यासमोर उभा राहिला. कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला. पण, याच बालेकिल्ल्याला २०१४ च्या निवडणुकीत भाजपने सुरूंग लावला. त्यावेळी काँग्रेसचे एकमेव आमदार होते. पालकमंत्री सतेज पाटील. पण, त्यांनाही आपला पराभव टाळता आला नाही. जिल्ह्याच्या इतिहासात ही काँग्रेसची मोठी पिछेहाट होती. पक्षनेतृत्वानेही याची गंभीर दखल घेत ७ सप्टेंबर २०१९ ला पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी तरुण, तडफदार व प्रबळ अशा पालकमंत्री पाटील यांची निवड केली. तत्पूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत तेही विजयी झाले होते.

kolhapur
Omicron : अमेरिका सावध; 4 रुग्ण आढळताच प्रवासावर लावले निर्बंध

दक्षिणमधून त्यांचे पुतणे ऋतुराज, करवीरमधून पी. एन. पाटील, हातकणंगलेतून राजू आवळे या काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या जागांवर उमेदवार निश्‍चित होते. पण, उत्तरमधून कोणाला उमेदवारी द्यायची हा मोठा प्रश्‍न होता. माजी आमदार मालोजीराजे, त्यांच्या पत्नी सौ. मधुरिमाराजे, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव बाजीराव खाडे, दौलत देसाई अशा काही नावांचा खल सुरू होता. छत्रपती घराण्यातून याबाबत असमर्थता दर्शवली. इतर नावांचा विचार करणे अवघड होते. त्याच दरम्यान जाधव हे पाटील यांच्या संपर्कात आले. त्यांनी आपण लढण्यास इच्छुक असल्याचे सांगितले. पण, त्यांच्या पत्नी जयश्री व भाऊ संभाजी हे महापालिकेत भाजपचे नगरसेवक होते. घरात भाजपचे नगरसेवक असताना जाधव यांना काँग्रेसची उमेदवारी द्यायची कशी? हा मोठा प्रश्‍न होता. त्यात दोनवेळा याच मतदारसंघात आमदार राहिलेल्या राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात लढायचे झाल्यास आर्थिक बाजूही भक्कम हवी हा विचारही होता. आर्थिक पातळीवर जाधव सक्षम वाटत असले तरी घरातील भाजपचे चिन्ह हा मोठा अडसर होता.

तत्पूर्वी जाधव यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. पण, युतीत उत्तरची जागा शिवसेनेला गेल्याने त्यांना उमेदवारी मिळाली नाही. म्हणून त्यांनी काँग्रेसचा पर्याय चाचपण्याचा प्रयत्न केला. पेठेतील वास्तव्य, खेळाडू म्हणून शहरातील पेठांत असणारी त्यांची ओळख, उद्योजक म्हणून शहर आणि जिल्ह्यातील उद्योजकांशी असलेला स्नेह, पेठेतील एक रांगडं व्यक्तिमत्त्व या निकषावर पालकमंत्री पाटील यांनीही त्यांच्या उमेदवारीला ताकद लावली. त्यातून त्यांना उमेदवारी मिळाली. पालकमंत्री पाटील यांचे पाठबळ, पेठांची मदत, उद्योजकांचा सपोर्ट आणि विद्यमान आमदारांविषयी असलेली नाराजी यातून ते अवघ्या २० दिवसांत आमदार झाले. काँग्रेस कार्यालयही न बघितलेल्या जाधव यांनी पूर्वीच विधानसभेची तयारी केली होती. त्यासाठी भाजपकडून निवेदनेही काढली. यावरच त्यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. पण, विजयानंतर ते काँग्रेससोबतही प्रामाणिक राहिले. पक्षाच्या कार्यात सक्रिय राहिले. त्यांच्या निधनाने काँग्रेसचीही मोठी हानी झाली आहे.

kolhapur
"परदेशात गेलेला बॅडमिंटनपटू Omicron मुळे..."; पालकांनी मागितली मदत

बोलले त्याप्रमाणे कृती...

मी हे करणार, ते करणार असली आश्‍वासने कधीच देणार नाही, मी शहराच्या पायाभूत सुविधा, अंबाबाई मंदिर, विमानतळ, उद्योग, थेट पाईपलाईन, पर्यटन व खेळ यावर भर देणार. घे कुदळ मार खड्डा, फोड नारळ असला विकास माझ्याकडून होणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी विधानसभेतील विजयानंतर ‘सकाळ’शी बोलतना दिली होती. विजयानंतर दिलेल्या शब्दाला ते शेवटपर्यत जागले, म्हणूनच ते लोकांतही लोकप्रिय आणि आवडते ठरले.

जल्लोषातून थेट घटनास्थळी

एकीकडे जाधव यांच्या विजयाचा जल्लोष सुरू असतानाच शुक्रवार पेठेतील त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. याची माहिती मिळताच त्यांनी विजयाचा जल्लोष बाजूला ठेवून थेट त्या कार्यकर्त्यांचे घर गाठले आणि त्याला आधार देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या निधनाने या आठवणींनाही उजाळा मिळाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com