esakal | आठवणींना उजाळा; सिनेमाच्या माध्यमातून सुमित्रा भावेंचा कोल्हापूरशी शेवटपर्यंत स्नेह
sakal

बोलून बातमी शोधा

आठवणींना उजाळा; सिनेमाच्या माध्यमातून सुमित्रा भावेंचा कोल्हापूरशी शेवटपर्यंत स्नेह

आठवणींना उजाळा; सिनेमाच्या माध्यमातून सुमित्रा भावेंचा कोल्हापूरशी शेवटपर्यंत स्नेह

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : स्त्री म्हणून नव्हे तर माणूस म्हणूनच आपल्या मातीतला चित्रपट बनवते, असे स्पष्ट मत प्रयोगशील लेखिका व दिग्दर्शक सुमित्रा भावे नेहमी व्यक्त करत. कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात तर त्यांचे जवळपास सर्वच सिनेमे प्रदर्शित झाले आणि त्याला भरभरून प्रतिसादही मिळाला. 2017 साली झालेल्या सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना कलामहर्षी बाबूराव पेंटर जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. बॉलिवूडचे प्रसिद्ध निर्माता व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा झाला होता. दरम्यान, सुमित्रा भावे यांचे आज सकाळी पुण्यात निधन झाले. यानिमित्ताने या साऱ्या स्मृतींना उजाळा मिळाला.

शब्द आणि वाङ्‌मयाचा जितका परिणाम माणसावर होत नाही. तितका परिणाम सिनेमाने मानवी मनावर होत असतो. त्यामुळे हे माध्यम सर्वात जास्त प्रभावी माध्यम ठरते. मानवी मनाची खदखदही सिनेमाच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडता येते. सध्याच्या डिजिटल युगात तर हे माध्यम अधिक प्रगल्भ होत चालले आहे. मात्र काही भडक गोष्टींवर नियंत्रण आणावेच लागेल, असे मत त्यांनी पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने व्यक्त केले होते. समाज आणि मानवी मन यांची नाळ जोडणारा सिनेमा बनवण्याला मी प्राधान्य दिले. हा खुलेपणा सिनेमा कलेसाठी महत्त्वाचा आहे. मात्र आज याच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लादली जात असलेली मतभिन्नतेची कुंपणं कलाकाराच्या प्रतिभेला बांधून ठेवत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली होती.