esakal | व्हॅलेंटाईन अन्‌ ओंजळ रक्तफुलांची!
sakal

बोलून बातमी शोधा

व्हॅलेंटाईन अन्‌ ओंजळ रक्तफुलांची!

व्हॅलेंटाईन अन्‌ ओंजळ रक्तफुलांची!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नेहमीच विधायक कार्यासाठी अग्रेसर असलेल्या शिवाजी पेठेतील मरगाई गल्ली मंडळाने राष्ट्रभावनेतून "एक ओंजळ रक्तफुलांची' हा उपक्रम सातत्याने राबवला आहे. मुंबई दहशतवादी हल्ला शहीद स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक वर्षी 26 नोव्हेंबरला हा उपक्रम होतो आणि यंदा या उपक्रमाची दशकपूर्ती झाली. त्याशिवाय कॉलेज जीवनात येथील काही तरुणाईने युवा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून व्हॅलेंटाईन डेला सुरू केलेल्या रक्तदान उपक्रमाने यंदा पंधरा वर्षे पूर्ण केली आहेत. शहर आणि परिसरातील रक्तदान चळवळीतील ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं. मात्र, या तरुण कार्यकर्त्यांनीही लसीकरणापूर्वी रक्तदानाचे आवाहन केले आहे.

शिवाजी पेठेतील मरगाई मित्र मंडळाने नेहमीच वैविध्यपूर्ण संकल्पना राबवल्या आणि त्या यशस्वी केल्या. 29 नोव्हेंबर मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या स्मृती जपताना राष्ट्रभावना वाढीस लागावी, या उद्देशाने मंडळाने 2010 पासून "एक ओंजळ रक्तफुलांची' हा उपक्रम सुरू केला आणि प्रत्येक वर्षी या उपक्रमातून मंडळाने पन्नासहून अधिक कार्यकर्ते न चुकता रक्तदान करतात. देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या शहीद जवानांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करून स्मृतिज्योत प्रज्वलित करण्यात येते आणि दिवसभर रक्तदानाचा उपक्रम होतो.

युवा ऑर्गनायझेशनचा विचार केला, तर ही मंडळी कॉलेजला असताना व्हॅलेंटाईन डेची क्रेझ होती; पण प्रेम म्हणजे केवळ प्रियकर-प्रेयसी इतकेच मर्यादित नसून राष्ट्रप्रेमही तितकेच महत्ताचे आहे, या विचारातून रक्तदान शिबिराचे आयोजन त्यांनी केले. पंधरा वर्षांपूर्वी ऐन तारुण्यात या मंडळींनी हा उपक्रम सुरू केला. प्रत्येक वर्षी जानेवारीत ही मंडळी एकत्र येतात आणि रक्तदान शिबिराची तयारी सुरू होते. राजारामपुरी पहिली गल्लीतील उद्यानात 14 फेब्रुवारीला रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. "प्रेम करायचे, तर रक्तदान करूनच,' ही टॅगलाईन घेऊन होणाऱ्या या उपक्रमात प्रत्येक वर्षी पाचशेहून अधिक रक्तदाते रक्तदान करतात.

मरगाई गल्ली मंडळातर्फे 10 वर्षे आम्ही रक्तदान शिबिराचे आयोजन करतो. मी स्वतः आजवर 43 वेळा रक्तदान केले. काही वर्षांत अनेक गरजूंना या उपक्रमातून संकलित झालेल्या रक्ताचा फायदा झाला. कोरोना काळातही आता लसीकरणापूर्वी सर्वांनी रक्तदान केले पाहिजे.

- सूरज साळोखे

युवा ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आम्ही सहा हजाराहून अधिक पिशव्या रक्तदान केले असावे. समाजातील अनेक गरजूंचे रक्तासाठी संपर्क करताच आम्ही त्यांना मोफत रक्त मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतो.मात्र, आता लसीकरणापूर्वी रक्तदानावरही सर्वांनीच भर दिला पाहिजे.

- मंदार तपकीरे

Edited By- Archana Banage

loading image