Navratri : श्री अंबाबाईची दुर्गादेवी रूपात पूजा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

Navratri : श्री अंबाबाईची दुर्गादेवी रूपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज करवीर निवासिनी श्री अंबाबाईची दुर्गादेवी रूपात सालंकृत पूजा बांधली. दिवसभरात दीड लाखांहून अधिक भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. श्रीसूक्त पठणासह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साक्षीने उत्सवातील उत्साह आता टिपेला पोचणार आहे. मुख्य दर्शनरांगेबरोबरच मुखदर्शनालाही प्रतिसाद मिळतो आहे. मुख्य दर्शनरांग आज भवानी मंडपापर्यंत पोचली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील विविध ठिकाणांहून नवदुर्गा दर्शनासाठी सुविधा उपलब्ध असल्याने आता या माध्यमातूनही मंदिरात गर्दी वाढू लागली आहे.

दरम्यान, ऐतिहासिक भवानी मंडपातील तुळजाभवानी मंदिरात कमलपुष्पावरील खडी पूजा बांधली. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात रात्री हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा सजला.

अष्टभुजा सिंहवाहिनी दुर्गा

करवीर निवासिनी श्री अंबाबाई अष्टभुजा सिंहवाहिनी दुर्गेच्या रूपात सजली आहे. दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप महात्म्याच्या अकराव्या अध्यायात देवीने स्वतःच्या भविष्यात्मक अवतारांचा उल्लेख केला आहे. त्या वेळेला पुढे दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल, असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे. या स्वरूपात भगवती अष्टभुजा धारण करून सिंहावरती विराजमान आहे. हातामध्ये शंख, चक्र, खड्ग, धनुष्यबाण, वरद कमळ, त्रिशूळ, तलवार आदी आयुधे तिने धारण केली आहेत. दुर्गा या नावाने आदिशक्तीच्या दुस्तर म्हणजे अवघड गोष्टींना सुद्धा सोपं करणारी या रूपाचा बोध होतो, असे श्रीपूजक अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, श्रीनिवास जोशी आणि सचिन गोटखिंडीकर यांनी सांगितले.

उत्सवातील आजचे सांस्कृतिक कार्यक्रम

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात सकाळी आठ वाजता कृष्णविहार भजनी मंडळ, साडेनऊला स्वरगंधा भजनी मंडळ, अकरा वाजता ज्ञानेश्वर महिला भजनी मंडळ, साडेबाराला विठुमाऊली भजनी मंडळ, दोनला महालक्ष्मी महिला सोंगी भजन, साडेतीनला श्रीराम महिला भजनी मंडळ, सायंकाळी पाचला समर्थ ग्रुप भावगीत गायन, सहाला सायली होगाडे यांचा कथ्थक आविष्कार आणि सायंकाळी सायला शुभांगी मुळे (पुणे) यांचा गीतबहार कार्यक्रम होईल. तुळजाभवानी मंदिरात सायंकाळी पाच वाजता अरुण जेरे यांचे शास्त्रीय संगीत गायन होईल. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रात्री नऊला गडमुडशिंगी येथील रामकृष्ण हरी सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल.

यंदा पारंपरिक उत्साहात बंगाली बांधवांचा उत्सव

पश्‍चिम बंगालमधील भौगोलिक व आर्थिक परिस्थितीमुळे तेथील मजूर राज्याच्या कानाकोपऱ्यात पोचला असून, त्या त्या ठिकाणच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचे काम करतात. लॉकडाउनचा मोठा फटका त्यांनाही बसला. जसे सर्व व्यवहार सुरळीत होऊ लागले आहेत, तसा हा समाजही हळूहळू सावरू लागला आहे. मात्र, लॉकडाउनच्या काळात मूळगावी परत गेलेले मजूर आता पुन्हा मोठ्या संख्येने परतले आहेत. गेली दोन दशके या समाजाचा नवरात्रोत्सव येथे साजरा होतो. मात्र, दोन वर्षे हा उत्सव प्रतीकात्मक पद्धतीने साजरा झाला होता. यंदा मात्र पारंपरिक उत्साहात दैवज्ञ बोर्डिंग येथे समाजबांधव उत्सव साजरा करणार आहेत.

जिल्ह्यात बंगाली मजुरांची संख्या पस्तीस हजारांवर आहे. शहरातील गुजरी परिसरात बंगालहून आलेल्या कारागिरांची संख्या मोठी असून आता त्यांची कुटुंबेही येथे स्थायिक झाली आहेत. येथील कारागिरांनी मिळून २००० साली येथे दुर्गा उत्सवाला प्रारंभ केला. उत्सवापूर्वी पंधरा दिवस अगोदर कोलकत्त्याहून गंगा नदीतील माती घेऊन मूर्तिकार येथे येतात. मूर्ती साकारून पुन्हा परत जातात. उत्सवापूर्वी दोन दिवस अगोदर ते पुन्हा येतात आणि मूर्तीची रंगरंगोटी व उत्सवाची सर्व तयारी करतात.

रास-दांडियाची धूम

दोन वर्षांनी यंदा रास-दांडियाची धूम अनुभवायला मिळणार आहे. आजपासून शहरातील विविध ठिकाणी रास-दांडियाच्या कार्यक्रमांना प्रारंभ झाला. गल्ली, अपार्टमेंट, सोसायटीत सामूहिक रास-दांडिया रंगणार असून, दांडियाच्या बाजारपेठेतही खरेदीसाठी मोठी गर्दी झाली आहे. गुरुवार (ता. २९) पासून शहरात दांडियाचे मेगा इव्हेंट रंगणार आहेत.