
कोल्हापूर : बहुसंख्याकवादी प्रवाहात ‘एनडीं’च्या विचारांची गरज
कोल्हापूर : देशात बहुसंख्याकवादी राजकीय प्रवाह बळकट होत असताना सर्वसामान्यांच्या न्याय-हक्कासाठी आयुष्यभर लढलेल्या ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या विचारांची सध्या गरज असल्याचे स्पष्ट मत सकाळ माध्यम समूहाचे संपादक -संचालक श्रीराम पवार यांनी व्यक्त केले.
हेही वाचा: Young weather champion : प्राजक्ता कोळी साधणार तरुणांशी संवाद
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे आयोजित प्रा.एन.डी. पाटील स्मृती ऑनलाइन व्याख्यानमालेचे आज दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘आजचे राजकारण आणि एन. डी. पाटील यांच्या कार्याची प्रस्तुतता’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डॉ. विलासराव पोवार अध्यक्षस्थानी होते. श्रीराम पवार यांनी ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. पाटील यांचा आयुष्यभराचा लढा, स्वातंत्र्यानंतरचे आणि विशेषतः नव्वदीनंतरचे विविध राजकीय प्रवाह आणि सद्यःस्थिती अशा अंगांनी हा संवाद खुलवला. ते म्हणाले, ‘‘आजवरच्या तीन दशकात अनेक राजकीय नेत्यांना जवळून अनुभवता आले.
पण, प्रा. डॉ. पाटील यांच्यासारखा एकमेव तत्त्वनिष्ठ नेता देशात तरी कुठला नसावा. तत्त्वांशी त्यांनी कधीच तडजोड केली नाही आणि त्यांनी उभारलेले सर्व लढे सर्वसामान्य घटकांसाठीचे होते. ज्यांना आपले हित कशात आहे हे सुद्धा समजत नव्हते, अशा घटकांना त्यांनी संघटित केले. त्यांना त्यांच्या हिताची जाणीव करून देत त्यांच्यासाठी लढे उभारले आणि ते यशस्वी केले. त्यांचे सारे आयुष्यच चळवळमय होते.’’
हेही वाचा: ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा ब्लॅक फंगसचा धोका? तज्ञ म्हणतात की..
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रात जेवढे सामाजिक लढे उभारले त्यात प्रा. डॉ. पाटील यांचा सहभाग होता आणि ते होते म्हणूनच हे लढे कधीच ‘मॅनेज’ झाले नाहीत किंवा त्यांच्यावर कुणी दबाव आणू शकले नाही, हे नव्या पिढीने जाणून घ्यायला हवे, ’ असेही पवार म्हणाले. सामाजिक कार्यकर्त्या मुक्ता दाभोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
डॉ. पाटील यांच्या कार्याचा अभ्यास आवश्यक
श्रीराम पवार म्हणाले, ‘‘सत्तेच्या राजकारणात प्रा. डॉ. पाटील किती यशस्वी झाले, यापेक्षा ते आयुष्यभर कुणासाठी लढले आणि त्यांची समाज बदलाची लढाई नेमकी काय होती?, या गोष्टी सद्यःस्थितीत सर्वांत महत्त्वाच्या ठरतात. त्यांनी सत्तेच्या चकोरासाठी कधीच राजकारण केले नाही. स्वातंत्र्यानंतर देशात तीन राजकीय प्रवाह असताना शेतकरी कामगार पक्षातून काम करण्याची भूमिका घेण्यामागची त्यांची भूमिकाही स्पष्ट होती आणि तिला फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची जोड होती. लोकशाहीच्या कणखरपणाचे आवरण पांघरून आता सत्ता काबीज केली जात आहे. मात्र, सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचा असेल तर चळवळीतील नवोदित कार्यकर्त्यांनी प्रा. डॉ.पाटील यांच्या एकूणच कार्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.’’
Web Title: Need Nd Thinking The Majority Stream
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..