esakal | अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगही मिळणार
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगही मिळणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : घटस्थापनेपासून राज्यातील मंदिरांसह सर्व प्रार्थनास्थळे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय शुक्रवारी झाला आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, दोन ते तीन दिवसांत भाविकांसाठीची नियमावली निश्चित होणार आहे.

परगावच्या भाविकांना दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगचीही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती आज पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. दरम्यान, सर्व संबंधित घटकांची संयुक्त बैठक झाल्यानंतरच नवरात्रोत्सव आणि दर्शनासाठीची नियमावली निश्चित केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पहिल्या लॉकडाउननंतर मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्यानंतर अंबाबाई मंदिरात दररोज विशिष्ट वेळेत दर्शनाची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र, आता सकाळी सहापासून रात्री नऊपर्यंत पूर्णवेळ दर्शन खुले राहण्याची शक्यता असून, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे मात्र काटेकोरपणे पालन केले जाणार आहे. पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश असेल आणि दर्शनानंतर दक्षिण दरवाजातून बाहेर पडता येईल.

‘सिद्धीविनायक’च्या धर्तीवर ऑनलाईन सुविधा

मुंबईतील सिद्धीविनायक ट्रस्टने भाविकांची गर्दी होऊ नये आणि त्याचवेळी भाविकांना दर्शनाचे समाधानही मिळावे, या उद्देशाने ऑनलाईन सुविधा दिली आहे. याच धर्तीवर अंबाबाई मंदिरातही सुविधा देण्याचा प्रयत्न असून लवकरच त्याला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांच्या दर्शनरांगेसाठीही थर्मल स्क्रिनिंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

loading image
go to top