
कोविडच्या प्रादुर्भावाने औषध दुकानदारांचे अर्थकारण बदलले आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांच्या मागणीत चौपट वाढ झाल्याचे सांगण्यात आले.
कोरोनाच्या भीतीपोटी व्हिटॅमिन, मल्टीव्हिटॅमिनला चौपट मागणी
कोल्हापूर : कोविडच्या प्रादुर्भावाने औषध दुकानदारांचे अर्थकारण बदलले आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या औषधांच्या मागणीत चौपट वाढ झाल्याचे सांगण्यात आले. व्हिटॅमिन सी व डी, मल्टीव्हिटॅमिन गोळ्यांना सर्वाधिक मागणी आहे. कोरोनाच्या भीतीपोटी लोकांचा गोळ्या खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.
मार्चअखेरीस लॉकडाउनला सुरवात झाली. हा लॉकडाउन पुढे किती काळ चालेल याची माहिती नसल्याने लोकांनी किमान महिन्याच्या औषधाच्या गोळ्यांची आगाऊ खरेदी केली. जूनअखेरपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या फारशी नव्हती. जुलैमध्ये यात झपाट्याने वाढ होत गेली.
कोविडमुळे पारंपरिक औषधांची मागणी कमी झाली आहे. त्वचारोगावरील औषधे, लहान मुलांच्या औषधांच्या मागणीत घट झाल्याचे सांगण्यात आले. कोविडमुळे सॅनिटायजर, हॅण्डवॉश, डेटॉल यांच्या मागणीत मोठी वाढ झाली.
सध्या बहुतांश ओपीडी बंद आहेत. सोशल डिस्टन्स ठेवूनच डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. ओपीडीतून ज्या गोळ्या लिहून दिल्या जात त्या औषधांची विक्री कमी झाली. बहुतांश लोक मास्कचा वापर करतात. प्रदूषणामुळे जे आजार जडत होते त्यांचे प्रमाण कमी झाले आहे.
घशाचे इन्फेक्शन होऊ नये, यासाठी जी औषधे उपलब्ध आहेत त्यांच्या विक्रीत वाढ झाली आहे.
गोळ्यांचा खप लाखावर
कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी दिवसाला 15 ते 20 हजार व्हिटॅमिनच्या गोळ्यांचा खप व्हायचा. आता हीच संख्या सुमारे एक लाख आहे. ज्याला जे जीवनसत्त्व हवे त्याप्रमाणे गोळ्या दिल्या जात होत्या. आता मात्र व्हिटॅमिन, मल्टीव्हिटॅमिन अशी सरसकट मागणी होत आहे. जिल्ह्यात औषध दुकानांची संख्या तीन हजार आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरात व्हिटॅमिनची मागणी अधिक आहे.
प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांच्या मागणीत तिप्पट ते चौपट वाढ झाली आहे. त्वचारोग, लहान मुलांच्या औषधांच्या मागणीत घट झाली आहे. ऍन्टीबायोटिकची मागणी पूर्वीसारखी राहिलेली नाही. बहुतांश लोक मास्कचा वापर करतात. प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
- संजय शेटे, अध्यक्ष, मेडिकल असोसिएशन
निरीक्षणे
* मार्चमध्ये हवेतील सल्फरडायऑक्साईडचे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी
* नायट्रोजनडाय ऑक्साईडचे प्रमाण 25 टक्क्यांनी कमी
* अतिसूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी
* सल्फरडाय ऑक्साइड, नायट्रोजनडाय ऑक्साईड, सूक्ष्म धुलीकणांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी
Web Title: Out Fear Corona Quadruple Demand Vitamins Multivitamins
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..