
कोल्हापूर : चांदोलीत सव्वा महिन्यात तीन हजारांवर पर्यटक
सरूड : कोरोनाने जवळपास दीड-दोन वर्षे बंद असलेले चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे पर्यटन सुरू झाल्याने पर्यटकांचा ओढा चांदोलीकडे वाढला आहे. दिवाळीपासून गेल्या सव्वा महिन्यापासून चांदोली हाऊसफुल्ल आहे. सव्वा महिन्यात ३२१८ पर्यटकांनी भेट दिली. १ जुलै २०१२ ला युनोस्कोने चांदोलीच्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा जागतिक वारसास्थळात समावेश केला. जैवविविधतेच्यादृष्टीने समृद्ध असलेल्या या जंगलात २७५ पक्षांच्या, ५९ सरपटणाऱ्या प्राण्यांच्या, उभयचर प्राण्यांच्या २५ फुलपाखरांच्या १२५ व तृण आणि मांसभक्षक प्राण्यांच्या ३६ प्रजाती आढळतात. एवढेच नव्हे तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून जगात सातव्या क्रमांकाचा प्रदेश आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील राखीव वनक्षेत्रापैकी २५१४ हेक्टर वनक्षेत्र पर्यटनासाठी खुले केले आहे. सकाळी ६ पासून पर्यटन करता येईल; मात्र सायंकाळी ६ च्या अगोदर जंगलातून बाहेर पडावे लागेल.
पर्यटकांनी निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायला हवा. त्याचबरोबर जंगलाचे म्हणून काही लिखित-अलिखित नियम असतात याचेही भान ठेवायला हवे. त्यांचे पालन केल्यास आपणास प्राणी, पक्षांचे निश्चित दर्शन होईल. चांदोली निसर्गाचा अनमोल ठेवा आहे, त्याचा आनंद घ्यायला हवा. दरम्यान, चांदोली पर्यटनासाठी प्रौढ व्यक्तीस ३० रुपये तर बारा वर्षांखालील व्यक्तीस १५ रुपये एवढे नाममात्र शुल्क आकारण्यात येते. खासगी वाहनांना जंगल भटकंतीसाठी मध्यम वाहनांना १५० रुपये व मोठ्या वाहनांना ३०० रुपये शुल्क आकारण्यात येते. येथील वाहन घेतल्यास १००० रुपये व गाईडचे २०० रुपये भरावे लागतात. नुकताच लागून गेलेला पाऊस आणि जंगलातली बहरलेली हिरवाई यामुळे अल्हाददायक वातावरणात पर्यटकांना मनमुराद मंगळवार ते रविवार अशी चांदोलीची भटकंती करता येणार आहे.
चांदोली व्याघ्र प्रकल्पातील प्रेक्षणीय स्थळे :-
शेवताई मंदिर
विठ्ठलाई मंदिर
झोळंबी झोळंबी सडा
झोळंबी येथील लपन गृह
नांदोली येथील जनीचा आंबा व वॉच टॉवर
पायर माळ येथील समाधान वॉच टॉवर
चांदोली बॅक वॉटरच्या बाजूने रिंग रोड
उदगिरी येथील काळम्मा मंदिर
उदगिरी येथील कोकण दर्शन पॉईंट
उखळू येथील धबधबा चांदोली धरण.
"चांदोली व्याघ्र प्रकल्पाचा जागतिक वारसास्थळात समावेश असल्याने येथे जैवविविधता आहे. वाघ, बिबट्या अथवा कोणताही एक प्राणी, पक्षी दिसेल या हेतूने येण्यापेक्षा इथली जैवविविधता पहा भारावून जाल."
-नंदकुमार नलावडे, वनक्षेत्रपाल, चांदोली उद्यान