esakal | पंचगंगा : कोल्हापूरची जीवनदायिनी

बोलून बातमी शोधा

null
पंचगंगा : कोल्हापूरची जीवनदायिनी; अशी आहेत पंचगंगेची आठ नावे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : पंचगंगा नदी ही पश्‍चिम घाटात म्हणजेच सह्याद्री पर्वतरांगांमध्ये उगम पावणाऱ्या पाच नद्यांची बनली आहे. लाव्हा पठार साडेसहा कोटी वर्षांपूर्वी प्रथम तयार झाले तेव्हाच त्यावर नद्यांचा उगम झाला. तेव्हापासून आतापर्यंत या नद्या आपली खोरी विकसित करत आहेत. पंचगंगाही याला अपवाद नाही. तेव्हापासून आजपर्यंत कोल्हापूरचे भूरूप विकसित होत आहे. आज दिसणारे त्याचे रूप हे पलायस्टोसिन काळात (दीड दशलक्ष वर्ष) विकसित झाले आहे.

- उदय गायकवाड

करवीर माहात्म्यमध्ये करवीर स्थानाबद्दल सांगताना "या स्थळी जलरुपात महादेव, पाषाण रुपात विष्णू, वालुका रुपात ऋषी मुनींचा समुदाय आणि वृक्ष रुपात देवांचा निवास आहे' असा उल्लेख आढळतो. भोगावती नदी दक्षिण पश्‍चिमेला फोंडा घाटाच्या माथ्यावर उगम पावते. राधानगरी अभयारण्याच्या परिसरातील अनेक प्रवाह तिला येऊन मिळतात. फेजिवडे गावाजवळ राधानगरी धरण बांधले आहे. तिला "सर्वरूपा' म्हटले आहे. राधानगरी आणि गगनबावडा तालुक्‍यांदरम्यान अभयारण्यात उगम पावणाऱ्या तुळशी नदीवर धामोडजवळ धरण असून, ती पुढे महे गावाजवळ भोगावती नदीला मिळते. तुळशी नदीचा शिवा किंवा "शिवस्वरूपिणी' असा उल्लेख करवीर माहात्म्यमध्ये आढळतो.

त्या लगतच्या खोऱ्यातून धामणी नदी उगम पावते. अद्याप अपूर्ण असलेला धरण प्रकल्प पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत असून, ही नदी कुंभी नदीच्या प्रवाहाला घरपणजवळ मिळते. करवीर माहात्म्यमध्ये तिला "ब्रह्मरुपिणी' म्हटले आहे. इथे सरस्वतीचा प्रवाह मिळतो ती "वेदरूपा' म्हणून उल्लेखलेली आहे. गगनबावडा परिसरात उगम पावलेल्या कुंभी नदीवर लखमापूर येथे धरण असून, ती पुढे धामणी नदीसह भोगावती व तुळशीच्या प्रवाहाला बहिरेश्‍वर येथे मिळते. तिला "ब्रह्मरूपिणी' म्हटले आहे.

अगदी उत्तर-पश्‍चिमेकडून विशाळगडाच्या दरम्यान कासारी नदी उगम पावते. कालिंदी व "विष्णूरुपिणी' असे करवीर माहात्म्यमध्ये नावे कासारी नदीला म्हटले आहे. तिला मनगर, जांभळी, गाडवली, भांगारी या उपनद्या अणुस्कुरा, शाहूवाडी, पन्हाळा भागातून उगम पावून मिळतात. कासारी नदी भोगावतीच्या पात्राला प्रयाग चिखली येथे मिळते. भोगावती व तुळशी आणि धामणी व कुंभी या चार नद्यांच्या प्रवाहाला प्रयाग चिखली येथे कासारी नदी मिळाल्यानंतर पंचगंगा असे ओळखले जाते. ही पंचगंगा पूर्वेला वाहत जाऊन कृष्णेला मिळते.

कृष्णेची उपनदी म्हणून तिची ओळख आहे. करवीर माहात्म्यमध्ये याशिवाय मयुरी, जयंती, गोमती, संजीवनी, गौतमी, कल्लोलिनी, गनिकी अशा उपनद्यांचा उल्लेख आढळतो. करवीर क्षेत्राच्या चारही दिशांना दोन दोन नद्या आहेत असा उल्लेख आहे. उत्तरेला वारणा व कृष्णा, पूर्वेला गणिकी व कृष्णा, पश्‍चिमेला वेदा व यक्षा म्हणजेच वेदगंगा व दूधगंगा आणि दक्षिणेला शिवा (तुळशी) व मयुरी असा उल्लेख आहे.

पंचगंगेचे पाणी फोंड्यापासून आंबा घाटापर्यंतच्या पाच नद्या आणि शेकडो नाल्या, ओढ्यातून वाहत येते. त्या नदीकडे केवळ पाणी म्हणून किंवा धार्मिक दृष्टीने बघता येणार नाही. तिची जैवविविधता, पर्यावरण, परिस्थिती, औषध मूल्य, पाण्यात मिसळलेली खनिजे, मुबलकता, सातत्य, निसर्ग सौंदर्य यांसह ती पंचगंगा कोल्हापूरची जीवनदायिनी आहे. तेच अस्तित्व अबाधित असेल तोवर कोल्हापूरचे अस्तित्व टिकेल.

पंचगंगेची आठ नावे

भोगावती, पंचनदी, मंदाकिनी, सुनीरा, स्वरग्‌ तरंगिणी, पयोवहा, पापहरा, पयोष्णी.

असा आहे उल्लेख...

आणिल्या कश्‍यपगालवगार्गयानी ll

शिवा भद्रा कुंभी या नद्या तिनी ll

वसिष्ठविश्‍वामित्रमुनींनी ll

सरस्वती भोगावती आणिल्या ll 20.50 ll

ऐशा पंचगंगा असती ll त्यांत प्रकट चार वाहती ll

गुप्त असे भोगावती ll त्या पांच नद्यांमध्ये ll20 .51 ll

Edited By- Archana Banage