esakal | पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर ; नृसिंहवाडीत आज तिसरा दक्षिणद्वार सोहळा?
sakal

बोलून बातमी शोधा

 मुसळधार पावसामुळे सोमवारी पंचगंगा नदीच्या पात्राबाहेर पाचव्यांदा पाणी आले.

‘राधानगरी‘चे चार दरवाजे उघडले; भात पिकाला पोषक, सोयाबीन, संकरित ज्वारीला धोकादायक

पंचगंगा पाचव्यांदा पात्राबाहेर ; 21 बंधारे पाण्याखाली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून पंचगंगा नदीचे पाचव्यांदा पाणी घाटावरून पात्राबाहेर पडले. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले. पंचगंगा नदीची पाणीपातळीसुद्धा कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्यावर वाढली असून ती रात्री आठ वाजता २८ फूट दहा ईंचापर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील एकूण 21 बंधारे पाण्याखाली आहेत. दरम्यान भात पिकाला हा पाऊस पोषक असला तरी काढणीस आलेल्या सोयाबीन आणि संकरित ज्वारीस धोकादायक आहे. संकरित ज्वारी काळी पडणार आहे.तर सोयाबीनला कोंब फुटणार आहेत.

तालुकानिहाय पाऊस

गगनबावडा तालुक्यात जिल्हयात सर्वाधिक ६४.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात काल दुपारी दीडवाजेपर्यंत पडलेल्या एकुण पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये अशी- हातकणंगले- ४.४, शिरोळ- २.७, पन्हाळा- १४.२, शाहूवाडी- ४९, राधानगरी -३५.३, गगनबावडा- ६४.५, करवीर- ९.३, कागल- ८.४, गडहिंग्लज- १०, भुदरगड- १०.८, आजरा-१५.६ व चंदगड- २६.१ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

21 बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे व खडक कोगे, वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव, कासारी नदीवरील यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, वाळोली, बाजारभोगाव आणि कुंभी नदीवरील शेणवडे या बंधाऱ्यांचा समावेश आहे.

काळम्मावाडी भरले

राधानगरी, सोळांकूर ः काळम्मावाडी धरण आज पूर्णक्षमतेने भरले असतानाच पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस राहिल्याने सायंकाळी पुन्हा पाणी विसर्गात अकराशे क्यूसेकने वाढ केली. धरणातून ७००० क्यूसेक विसर्ग दूधगंगा नदीत सुरू आहे. राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले यातून यासह वीजनिर्मितीसाठी असा ७११२ क्यूसेक विसर्ग भोगावती नदीत सुरू आहे. धरणात आज सायंकाळी २५.१० टीएमसी साठा झाला. साठवणक्षमता संपत आल्याने धरणाचे पाच वक्राकार दरवाजे ५० सेंटिमीटरने उघडले आहेत. धरण क्षेत्रात आजआखेर ३०१५ मिमी. पाऊश झाला.

दरम्यान पाणलोट क्षेत्रातील अतिवृष्टीने जलाशय पाणीपातळीत झपाट्याने वाढ सुरू राहिल्याने राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. धरणातून ७११२ क्युसेस पाणी विसर्ग सुरू आहे.भोगावती नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. धरणक्षेत्रात २४ तासात ९२ मिलिमीटर तर काल सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंतच्या दहा तासात ११८ मिमी. पाऊस झाला आहे.

गगनबावड्यात मुसळधार

आसळज : गगनबावडा तालुक्‍यात काल मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. कुंभी नदीवरील अणदूर, मांडुकली हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत तालुक्यात काल सकाळी संपलेल्या २४ तासात ११८.५० मिमी. तर आजअखेर ४७५०.५० मि.मी पावसाची नोंद झाली आहे. ऐन गणेशोत्सवात सुरू असलेल्या संततधार पावसाने गणेशभक्तांच्या आनंदावर विरजण पडले आहे.

पन्हाळगडावर ऊन पाऊस

पन्हाळा : दिवसभराच्या भन्नाट वाऱ्यानंतर काल दिवसभर पन्हाळा परिसरात काही वेळ पाऊस तर काही वेळ उन्हं असे वातावरण राहिले; पण जेवढा वेळ पाऊस थांबत होता, त्याच्या दुप्पट लगेच कोसळत होता.दिवसभर पडणाऱ्या या पावसाने ओढे, नाले ओसंडून वाहत होते. खरीपाच्या भात पिकाला हा पाऊस पोषक असला तरी काढणीस आलेल्या सोयाबीन आणि संकरित ज्वारी स हा पाऊस धोकादायक बनणार आहे, संकरित ज्वारी काळी पडणार आहे.तर सोयाबीनला कोंब फुटणार आहेत.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी : दत्त मंदिरासमोर पोर्चनजीक पाणी आले आहे. चार ते पाच फूट पाणी वाढल्यास आज दिवसभरात मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. (छायाचित्र : जितेंद्र आणुजे नृसिंहवाडी)

श्री क्षेत्र नृसिंहवाडी : दत्त मंदिरासमोर पोर्चनजीक पाणी आले आहे. चार ते पाच फूट पाणी वाढल्यास आज दिवसभरात मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. (छायाचित्र : जितेंद्र आणुजे नृसिंहवाडी)

नृसिंहवाडीत आज तिसरा दक्षिणद्वार सोहळा?; मंदिरासमोरील पोर्चला लागले पाणी

नृसिंहवाडी : येथील दत्त मंदिरात या मोसमातील तिसरा दक्षिणद्वार सोहळा आज दिवसभरामध्ये होण्याची शक्यता आहे. सतरा जूनला पहाटे दोन वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. बावीस जुलैला दुसरा दक्षिणद्वार सोहळा झाला. या वर्षी मंदिर बंद असल्यामुळे दक्षिणद्वार सोहळा भाविकांच्या स्नान पर्वणीशिवाय झाले.

धरण पाणलोट क्षेत्रातून सोडलेल्या व पडणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पात्रात दोन दिवसांत सुमारे आठ ते दहा फूट पाणी वाढल्याने दत्त मंदिरासमोरील दगडी पायऱ्यांवर पाणी आले आहे. ऐन गणेश उत्सवामध्ये महापूरसदृश स्थिती निर्माण झाल्यामुळे नदी काठावर घरे असणाऱ्या अनेकांच्या मनात पुन्हा महापुराच्या भीतीची छटा निर्माण होत आहे. रात्री चार ते पाच फूट पाणी वाढल्यास उद्या दिवसभरामध्ये श्रींच्या चरण कमलावर महापुराचे पाणी जाऊन तिसरा दक्षिणद्वार सोहळा होण्याची शक्यता आहे. सध्या मंदिरासमोरील पोर्चजवळ पाणी आले आहे. दक्षिणद्वार होण्यासाठी चार ते पाच फूट पाणी पातळीची आवश्यकता आहे. संगम मंदिरास महापुराच्या पाण्याचा वेढा बसला असून, देवस्थान ट्रस्टने घाटावरील आवश्यक साहित्य देवस्थान कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आहे.

loading image
go to top