esakal | कागल-चंदगड मतदारसंघांतर्गत राजकारणाला 'ऊत'
sakal

बोलून बातमी शोधा

कागल-चंदगड मतदारसंघांतर्गत राजकारणाला 'ऊत'

कागल-चंदगड मतदारसंघांतर्गत राजकारणाला 'ऊत'

sakal_logo
By
अजित माद्याळे

कोल्हापूर : चंदगड आणि कागल विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीतील राजकारण ‘गोकुळ’च्या निवडणूक निमित्ताने अधिकच चव्हाट्यावर आल्याचे चित्र आहे. या राजकारणातच हसन मुश्रीफ यांचे समर्थक व कागल मतदारसंघातील गिजवणेचे जि. प. उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या विरोधी आघाडीतील उमेदवारीला ऐनवेळी ‘रेड सिग्नल’ मिळाला. त्यांच्याऐवजी चंदगड मतदारसंघातील कुपेकर गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते महाबळेश्‍वर चौगुले यांना संधी दिली.

सत्तारूढ आघाडीकडून ताराराणी आघाडीचे सदानंद हत्तरकी व भाजपचे प्रकाश चव्हाण यांना, तर विरोधी आघाडीकडून पालकमंत्री सतेज पाटील यांचे समर्थक काँग्रेसचे विद्याधर गुरबे व राष्ट्रवादीचे श्री. चौगुले यांनी उमेदवारीत बाजी मारली. यातील हत्तरकी, चव्हाण, गुरबे हे तिघेही ‘गोडसाखर’चे विद्यमान संचालक असून, चौगुले माजी संचालक आहेत. गोडसाखर कारखान्याभोवती तालुक्‍यात गोकुळचे राजकारण फिरल्याचे चित्र आहे. सहा महिन्यांपूर्वी संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदाच्या निवडीवेळीही चंदगड व कागल मतदारसंघांतर्गत चुरस पाहायला मिळाली. त्याचीच पुनरावृत्ती गोकुळमध्ये झाल्याचे चित्र आहे.

चंदगड मतदारसंघाच्या गडहिंग्लज तालुक्‍यातील माजी आमदार संध्यादेवी कुपेकर गटाने स्वतंत्र मेळावा घेऊन उमेदवारीची मागणी केली. त्यानंतर मंत्री मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला. ठराव संकलनात घेतलेली आघाडी विचारात घेता अखेरपर्यंत जि. प. उपाध्यक्ष पाटील यांना उमेदवारी पक्की मानली जात होती; परंतु दुसऱ्या बाजूने चंदगड मतदारसंघातील कुपेकर गटालाच उमेदवारी मिळावी म्हणून झालेले राजकारण व आमदार पाटील यांचा आग्रह यामुळे श्री. चौगुले यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. यातूनच श्री. पाटील यांची उमेदवारी कट झाल्याचे सांगितले जाते. यावरून चंदगड व कागलमध्ये सुरू असलेले राजकारण चव्हाट्यावर आले आहे.

भविष्यातील राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, अनेक इच्छुकांनी दाखल केलेली उमेदवारी मागे घेतली आहे. बाळासाहेब कुपेकर यांच्यासह शिवसेनेचे संग्राम कुपेकरांच्या पत्नी गंधालीदेवी यांना आणि जनता दलाचे नेते ॲड. श्रीपतराव शिंदे यांच्या कन्या स्वाती कोरी यांनाही उमेदवारी मिळाली नाहीराजकुमार हत्तरकी यांनी अनेक वर्षे संचालक होते. आता त्यांचे चिरंजीव सदानंद यांना सत्तारूढ आघाडीने उमेदवारी दिली आहे. गतवेळच्या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला.

हत्तरकींना मानणाऱ्या ठरावधारकांची संख्या लक्षात घेऊन सत्तारूढ पॅनेलने सदानंद यांना पुन्हा उमेदवारी देत मतदान पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्यासोबत ठरावांची संख्या विचारात घेत भाजपच्या चव्हाण यांनाही सत्तारूढांनी संधी दिली आहे. विरोधी आघाडीतून श्री. चौगुले व श्री. गुरबे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला. त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीला मानणाऱ्या ठरावधारकांचे बळ मिळण्यास मदत होणार आहे. एकंदरीत गोकुळच्या निमित्ताने राजकारणाची घुसळण होत असून, हळूहळू चुरशीचे वातावरण तयार होत आहे.

दोन दशकानंतर उमेदवार वाढले

‘गोकुळ’साठी तालुक्‍यात सध्या २७३ ठरावधारक आहेत. पूर्वी तानाजी मोकाशी व राजकुमार हत्तरकी असे दोन संचालक होते; परंतु मोकाशी यांच्या निधनानंतर गेली २५ वर्षे हत्तरकी एकमेव संचालक होते. हत्तरकींच्या निधनानंतर तर पाच वर्षांत तालुक्‍याची पाटी कोरीच राहिली, मात्र स्वीकृतच्या रूपाने एक संचालकपद मिळाले. दोन दशकांनंतर दोन्ही आघाड्यांकडून प्रत्येकी दोन उमेदवार मिळाले आहेत.

loading image