
Kolhapur News : वॉल पेंटिंगमधून हत्तीविषयी सकारात्मक संदेश
चंदगड : चंदगड व आजरा तालुक्यात हत्ती आणि मानव यांच्यातील संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने दाखल झालेले हत्ती अभ्यासक आनंद शिंदे आणि त्यांच्या ट्रंक कॉल द वाइल्ड लाइफ फाउंडेशन संस्थेचे सहकारी विविध माध्यमांचा आधार घेत आहेत.
ग्रामस्थांशी संवाद, हत्तीचे निसर्गातील महत्त्व पटवून देत असताना आता त्यांनी भित्तिपत्रकातून हत्तीविषयी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. येथील सेंट स्टीफन स्कूलची भिंत तसेच न्हावेली येथील एका घराच्या भिंतीवर हत्तीचे चित्र काढून या प्राण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याचे आवाहन केले आहे.
ज्या परिसरात हत्तींचा वावर आहे तिथे शासनाकडून नागरिकांना खबरदारीची सूचना देताना हत्तीबाधित क्षेत्र, हत्तीपासून सावध राहा अशा प्रकारचे फलक लावण्यात आले आहेत. ते वाचून व्यक्तीच्या मनात भीती निर्माण होते.
त्या प्राण्याबाबत तिरस्काराची भावना तयार होते. त्याऐवजी हत्तीचे पर्यावरणातील स्थान, त्याच्या असण्याचा मानवी मनाला होणारा आनंद अशा प्रकारची चित्रे साकारण्याची संकल्पना संस्थेचे शैलेश साळवी यांनी मांडली. त्याचा पहिला प्रयोग न्हावेली येथे करण्यात आला.
रस्त्याला लागूनच फडणीस यांच्या घराची भिंत रंगविण्यात आली. तिथे फ्री हॅंड पद्धतीने चित्र साकारण्यात आले. ते पाहून चंदगड येथील सेंट स्टीफन स्कूलने आपल्या शाळेच्या भिंतीवर अशा प्रकारचे चित्र काढण्याची विनंती केली. साळवी यांनी विद्यार्थ्यांची आकलनशक्ती विचारात घेऊन तिथे वारली पद्धतीचा अवलंब केला.
ते चित्र रेखाटत असताना काही विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याची विनंती केली. एक पालकही सहभागी झाले आणि सर्वांच्या सहभागातून हे चित्र तयार झाले. ‘निसर्ग वाढवूया, स्वतःला वाचवूया’ असे ब्रीदवाक्य घेऊन ही चित्रे साकारली आहेत. अजूनही मागणी झाल्यास काही शाळा, मध्यवर्ती चौकातून अशी चित्रे काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकारात्मक संदेशामुळे मनातील भीती दूर होते. पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. केवळ दोनच चित्रे काढल्यावर अनेक ठिकाणांहून आम्हाला आपल्याकडेही अशी चित्रे काढण्याची मागणी होत आहे. ज्या उद्देशाने इथे आलो आहोत, त्याला नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून समाधानी आहोत.
- शैलेश साळवी, चित्रकार व सदस्य, ट्रंक कॉल द वाइल्ड लाइफ फाउंडेशन