esakal | मैदान नाही, खुराकाला पैसा नाही!; हजारो पैलवानांचे भवितव्य धोक्‍यात

बोलून बातमी शोधा

null

मैदान नाही, खुराकाला पैसा नाही; हजारो पैलवानांचे भवितव्य धोक्‍यात

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : कुस्ती हे महाराष्ट्राचे वैभव. कोल्हापूरच्या तांबड्या मातीने देशाला अनेक पैलवान दिले; परंतु कोरोना महामारीत पैलवानांची वाताहत सुरू आहे. वर्षभरापासून पैलवानांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या कुस्ती स्पर्धा, यात्रा-जत्रा, उरसात होणारी कुस्ती मैदाने बंद झाल्याने हजारो पैलवानांचे भवितव्य धोक्‍यात आले आहे. शासनाने विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी पैलवानांकडून होत आहे.

गेल्या वर्षातला चैत्र व श्रावण महिन्यातला पैलवानांचा कुस्ती हंगाम कोरोनामुळे हुकला. यंदा तरी सर्व सुरळीत होईल या आशेने दिवाळीपासून आखाड्यात दाखल होत पैलवानांनी कसून सराव केला. 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा होईल, गावोगावची मैदाने होतील आणि गेल्या वर्षीची कसर भरून काढता येईल, असा बेत मल्लांनी आखला होता; परंतु मार्चपासून पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने पैलवानांच्या आशेवर पाणी पडले आहे. पैलवानांना त्यांच्या सरावाप्रमाणे तगडा खुराकही घ्यावा लागतो. बदाम, दूध, तूप, फळे, मटण या सर्व घटकांसाठी मासिक हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो. कुस्तीच्या सरावासाठी शेतकरी व सामान्य कुटुंबातील अधिक पैलवान कोल्हापुरात येतात. त्यांचा खुराकाचा खर्च भागत नसल्याने त्यांना घरी परतावे लागत आहे.

आयपीएल होते; पण 'महाराष्ट्र केसरी' नाही...

क्रिकेटच्या स्पर्धा होतात; परंतु 'महाराष्ट्र केसरी' सारखी मानाची कुस्ती स्पर्धा गेल्या वर्षीपासून होत नाही. निदान प्रेक्षकविरहित तरी ही स्पर्धा घ्यावी. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर ही स्पर्धा झाल्यास पैलवानांत नवचैतन्य निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया मल्ल व वस्ताद मंडळी व्यक्त करत आहेत.

"कोरोनाने मल्लांचेही हाल केले. वर्षभरापासून त्यांना कोणताच आधार नाही. अनेकांनी कुस्ती थांबवली आहे. गरीब मल्लांवर मजुरी शोधण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. राज्य शासनाने विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे."

- पै. अमृत भोसले, वस्ताद, इचलकरंजी