esakal | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रब्बी क्षेत्र 5 टक्क्यांनी वाढवणार
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रब्बी क्षेत्र 5 टक्क्यांनी वाढवणार

पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी याच पावसामुळे तालुक्यातील रब्बी हंगामाला हातभार लागणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रब्बी क्षेत्र 5 टक्क्यांनी वाढवणार

sakal_logo
By
ऋषीकेश राऊत

इचलकरंजी : चालू वर्षातील पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत समाधानकारक पाऊस झाल्याने हातकणंगले तालुक्यातील नदी, नाले, तलाव, विहिरीत पाण्याच्या पातळीत स्थिरता आली आहे. पावसाने खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी याच पावसामुळे तालुक्यातील रब्बी हंगामाला हातभार लागणार आहे. कृषी विभागाने यंदाच्या हंगामात सरासरी ६ हजार ३३ हेक्टरवर पेरणीचे नियोजन केले असून १८.२१ टक्क्यांनी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तालुका कृषी विभागाने प्रत्येक गावात ५ टक्के रब्बीचे क्षेत्र वाढवण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवले आहे.

रब्बी पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

गतवर्षी रब्बी गहू, रब्बी ज्वारी, मका, हरभरा, भाजीपाला अशी इतर पिके मिळून ४ हजार ९३२ हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची लागवड केली होती. यावर्षी रब्बी ज्वारी या मुख्य पिकासह तालुक्यात ६ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे नियोजन असून सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता मुबलक आहे. मका पिकाखालील क्षेत्रात यावर्षी विक्रमी वाढ होण्याची शक्यता आहे. हे प्रमाण तब्बल १८ हेक्टरवरून ३५० हेक्टरवर जाऊ शकेल. गावोगावी कृषी खात्याने यावर भर देण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: 'अजित पवार हिम्मत असेल तर 'त्या'ची पक्षातून हकालपट्टी करा'

ज्वारीला शेतकऱ्यांची पसंती

रब्बी हंगामातील ज्वारी हे महत्त्वाचे पीक आहे. रब्बी ज्वारी ही धान्य आणि कडबा उत्पादनासाठी उपयुक्त ठरते. दरवर्षी मका व गहू या पिकावर रब्बीत विविध रोगांचा व अवकाळी पावसाचा प्रादूर्भाव होत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाही सरासरी ज्वारी पिकालाच पसंती दर्शवली आहे. ज्वारी खाण्यासाठी लाभदायक व बाजारपेठेत अपेक्षित भाव मिळत असल्याने यंदा ज्वारीच्या उत्पादनात वाढ होणार असल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तालुक्यात यंदा ज्वारीचे प्रमाण तब्बल ११.५२ टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

उसाचे क्षेत्र वाढणार

तालुक्यात महापुरात उसाचे प्रचंड नुकसान झाले. त्यानंतर शेतकऱ्यांनी शेतजमिनी तयार करून ठेवल्या; मात्र यामध्ये कोणतीही पिके शेतकऱ्यांनी घेतली नाहीत. त्यामुळे अशा शेतजमिनी आता उसाच्या लावणीसाठी प्रतीक्षेत आहेत. पाऊस थांबला की, ऑक्टोबरच्या शेवटी लावणीला गती येणार आहे. यंदा १ हजार ५५५ हेक्टरने वाढ होणार असून हे उसाचे क्षेत्र २३ हजार ८०० हेक्टरवर पोहचेल.

हेही वाचा: अभिनेत्री नोरा फतेही ED ने बजावलं समन्स

प्रात्यक्षिकाखाली ३०० हेक्टर

रब्बी हंगामासाठी तालुका कृषी विभागाने ३०० हेक्टरवर प्रात्यक्षिक क्षेत्र निश्चित केले आहे. ज्वारी आणि हरभरा ही प्रमुख पिके यामध्ये घेतली जाणार आहेत. यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज मागवले. यासाठी ८०० लाभार्थी निवडले. प्रात्यक्षिक क्षेत्रात फुले रेवती जातीची ज्वारी, हरभरा यांचे उत्पादन घेतले जाईल. याची शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी मदत होणार आहे.

ज्वारीच्या बियाण्यांचे वाटप

तालुक्यात ज्वारी, हरभरा ही रब्बीची प्रमुख पिके आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतून तालुका कृषी विभागाने आतापर्यंत ३०० क्विंटल ज्वारीच्या बियाण्यांचे वाटप केले आहे. तसेच ७० हेक्टर क्षेत्रावरील हरभऱ्याचे बियाणे दाखल झाले आहे.

हेही वाचा: 'आई कुठे काय करते'मधील 'अरुंधती'चा कधी न पाहिलेला अंदाज

loading image
go to top