esakal | VIDEO::श्री अंबाबाई मंदिरातील श्रीराम नवमी उत्सव सोहळा पाहा व्हिडीओ

बोलून बातमी शोधा

VIDEO: श्री अंबाबाई मंदिरातील श्रीराम नवमी उत्सव सोहळा पाहा व्हिडीओ
VIDEO: श्री अंबाबाई मंदिरातील श्रीराम नवमी उत्सव सोहळा पाहा व्हिडीओ
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रथोत्सव आणि भव्य कार्यक्रमांना फाटा देऊन यंदा सलग दुसऱ्या वर्षी श्रीरामनवमी साधेपणाने साजरी झाली. केवळ मंदिरात धार्मिक विधी आणि जन्मकाळ सोहळा मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत साजरा झाला. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील श्री छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या अखत्यारितील श्रीराम मंदिरात दुपारी जन्मकाळ सोहळा तर सायंकाळी प्रतिकात्मक पालखी सोहळा झाला. दरम्यान, श्रीरामनवमीपासून हनुमान जयंतीपर्यंत शहरात महाप्रसादांची धूम असते. यंदा सर्वच मंदिरे आणि मंडळांनी महाप्रसादांनाही फाटा दिला आहे.

खरी कॉर्नर येथील राघवेंद्र स्वामी मठ, हरीओमनगरातील इस्कॉन मंदिर, मंगळवार पेठेतील राम गल्ली येथील श्रीराम तरुण मंडळ, रंकाळवेस तालीम मंडळ साईमंदिर, दिलबहार तालीम साई मंदिर आदी ठिकाणीही साधेपणाने उत्सव साजरा झाला. यंदा कार्यक्रमांनाही फाटा देण्यात आला असला तरी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अनेकांनी गीतरामायण सादर केले आणि त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावरून सर्वत्र शेअर केले.

रंगली विशेष गीतांची मैफल

रामनवमीनिमित्त प्रतिज्ञा नाट्यरंग संस्थेतर्फे "तू प्यार का सागर है' ही ऑनलाईन गीत मैफल रंगली. गायक गंगाराम जाधव यांचा स्वरसाज होता तर विजय जाधव निवेदन होते. या मैफलीचा लाभ घेणाऱ्यांनी गरजू रूग्णांसाठी "गुगल पे'च्या माध्यमातून ऐच्छिक शुल्क जमा करण्याचे आवाहन प्रशांत जोशी यांनी केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सोशल मीडियावरून यंदाही कल्पक संदेश शेअर झाले. रामनवमीच्या निमित्ताने कोरोनाचा वध करूया, अशा आरोग्यदायी संदेशांचा त्यामध्ये समावेश होता.

शिवाजी चौकात प्रसाद वाटप

शहरातील हिंदूत्ववादी संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी प्रसादाचेही वाटप झाले. सेवाव्रत प्रतिष्ठानचे संभाजी साळुंखे, नितेश कोकितकर, सनी पेणकर, अजित पाटील, सागर साळुंखे, सुहास शंदे, सिध्दार्थ कटकधोंड, अनिल कोडोलीकर, युवराज भोसले, प्रसाद मोहिते, सुनील पाटील, अनिल चोरगे, राजू गडकरी, अमित माळी आदींनी संयोजन केले.