esakal | राणी चन्नम्मा विद्यापीठाचा निर्णय: आरसीयूच्या परीक्षा 26 एप्रिलपासूनच

बोलून बातमी शोधा

null
राणी चन्नम्मा विद्यापीठाचा निर्णय: आरसीयूच्या परीक्षा 26 एप्रिलपासूनच
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाअंतर्गत (आरसीयू) येणाऱ्या महाविद्यालयांच्या पदवी आणि पदव्युत्तर परीक्षा परिवहनच्या संपामुळे पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मात्र, सध्या परिवहनचा संप संपल्यामुळे त्या परीक्षा 26 एप्रिलपासून घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. राज्यात सध्या मिनी लॉकडाऊन असूनही विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

पदवीच्या परीक्षा मार्च महिन्यापासून तर पदव्युत्तरच्या परीक्षा पाच एप्रिलपासून सुरू झाल्या होत्या. मात्र, सात एप्रिल पासून परिवहन महामंडळाने राज्यभर संप सुरू केल्यामुळे सदरच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. पदवीच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात संपणार होत्या. मात्र, परिवहनच्या संपामुळे त्या पुढे ढकलण्यात आल्या. पंधरा दिवसानंतर परिवहनने बुधवारी (ता. 21) आपला संप मागे घेतला. यामुळे परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. पदवीच्या परीक्षा 26 एप्रिल पासून तर पदवीधरच्या परीक्षा 28 एप्रिलपासून घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला असून त्यासंबंधी एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. परीक्षेचे वेळापत्रक शुक्रवारी सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार आहे.

दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने राज्यात विकेंड लॉकडाऊन व नाईट करफू घोषित केला होता. पण, बुधवारी रात्री एक पत्रक काढून मिनी लॉकडाऊन लागणार नसल्याचे घोषित केले आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता व्यापारी आस्थापने व अन्य सेवा बंद असणार आहेत. तसेच परिवहनच्या बसेस देखील केवळ पन्नास टक्केच रस्त्यावर धावणार आहेत. असे असताना देखील राणी चन्नम्मा विद्यापीठाने परीक्षा घेण्याचा घेतलेला निर्णय आश्चर्यचकित मानला जात आहे.

राणी चन्नम्मा विद्यापिठात शहरासह ग्रामीणमधून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी जातात. ग्रामीण ला म्हणाव्या तशा बसेस सुरू नाहीत, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळेत हजर राहताना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तसेच बेळगाव सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे परीक्षा घेण्याचे आव्हानच विद्यापीठासमोर आहे. परीक्षा घेण्याचा निर्णय राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

या परीक्षा होणार...

सोमवारपासून (ता. 26) पदवीच्या पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या सेमिस्टरच्या तसेच एमबीए तिसऱ्या सेमिस्टर ला पुन्हा सुरुवात होईल. त्यानंतर पदव्यूतरच्या पहिल्या व तिसऱ्या तसेच एमसीएच्या पाचव्या सेमिस्टरला बुधवारनंतर (ता.28) सुरुवात होईल. बेळगाव, विजापूर व बागलकोट या परीक्षा केंद्रावर परीक्षा होणार आहेत. सुधारित वेळापत्रक महाविद्यालयांना पाठविले आहे. तसेच विद्यापीठाच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात आले आहे.

Edited By- Archana Banage