Kolhapur : ई-पास प्रिंटसाठी २० रुपयांचा भुर्दंड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur ambabai temple

ई-पास प्रिंटसाठी २० रुपयांचा भुर्दंड

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांना दर्शनासाठी ई-पास बंधनकारक आहे. त्याचे काही सकारात्मक परिणामही दिसू लागले आहेत आणि काही संघटनांकडून विरोधही कायम आहे. मात्र, मंदिरातील गर्दी आता वाढतच असून, सामान्य अशिक्षित आणि परराज्यातील भाविकांना ई-पासबाबतची तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना प्रिंटसाठी २० ते ३० रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत असल्याचे चित्र सध्या मंदिर परिसरात आहे.

प्रिंट अन् ई-पासही

दिवाळीनंतर आता देशभरातून भाविक मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. कोल्हापुरात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर मोबाईलवरून ई-पासची नोंदणीही ते करतात. पण, तो मोबाईलमध्ये नेमका कुठे सेव्ह केला आहे, हे अनेकांना समजत नाही. त्याशिवाय अनेकांनी दुसऱ्यांच्या मोबाईलवरून नोंदणी केलेली असते आणि गर्दीमुळे ते अन्यत्र राहतात. त्यामुळेही दर्शन रांगेत गर्दी अधिक असल्यास गोंधळ उडतो.

या साऱ्या पार्श्वभूमीवर ई-पासची प्रिंट काढून घेतली जाते. मात्र, त्यासाठी मंदिर परिसरातील दुकानदारांकडून प्रतिप्रिंट २० ते ३० रुपये आकारले जातात. जरी ई-पास काढला नसला, तरी आयत्यावेळी दुपारच्या वेळेतील स्लॉटमध्ये ई-पास काढून दर्शनाची संधी मिळण्याची शक्यता असते. कारण एका तासाच्या कालावधीत दीड हजार भाविकांना ई-पास काढता येतो आणि दुपारच्या वेळेत तो काढणाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अशा पद्घतीने ई-पास काढून देणारी यंत्रणाही आता मंदिर परिसरात कार्यरत झाली आहे.दोन दिवसांपूर्वी एका गावाहून आलेल्या काही कुटुंबाकडून तब्बल सहाशे रुपये त्यासाठी घेतल्याचे निदर्शनास आले आहे.

गर्दीच्या वेळी गोंधळई-पास यंत्रणेसाठी सध्या चार कर्मचारी कार्यरत आहेत. गर्दी नसताना त्यांना भाविकांना तांत्रिक माहिती देणे शक्य असते. मात्र, गर्दीच्या वेळी त्यांचा सारा वेळ पास तपासण्यासाठीच जातो. त्यामुळे या व्यवस्थेशिवाय आणखी एक मार्गदर्शन कक्ष देवस्थान समितीने उभा करावा आणि तेथे भाविकांना सुलभ दर्शनासाठीचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, अशी मागणी भाविकांतून होत आहे. (शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत सरासरी २० ते २५ हजारांवर भाविक ई-पासच्या माध्यमातून दर्शन घेतात.)

loading image
go to top