संगमेश्वर : आरवलीत चौपदरीकरण आराखडा बासणात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गावर फ्लायओव्हर

संगमेश्वर : आरवलीत चौपदरीकरण आराखडा बासणात

संगमेश्वर : आरवली येथे बाजारपेठेतून जाणाऱ्या महामार्गावर फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहे. यामुळे व्यापारी तसेच छोटे-मोठे दुकानदार यांचा व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहे. सुरवातीला जमिनीचे संपादन केले होते त्यापेक्षा अधिक जागेवर काम सुरू केल्याचे दिसून येत आहे, असा आरोप माजी पंचायत समिती सदस्य जाकिर शेकासन यांनी केला आहे. याबाबत काही दुकानदार व्यापाऱ्यांनी ठेकेदार कंपनीच्या लोकांना विचारले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महामार्गाच्या कामासाठी जो आराखडा तयार केला त्या आराखड्याला अनुरूप काम व्हायला हवे होते; मात्र आता त्यानुसार काम होत नसल्याचे होणाऱ्या कामावरून दिसून येत आहे, असेही शेकासन यांनी सांगितले.

आरवली (ता. संगमेश्वर) येथील चौकात महामार्ग चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू झाले असले तरी सर्व्हिस रोड पावसाळ्यात डोकेदुखी ठरणार आहे. सर्व्हिस रोडचे खडीकरण आणि मजबुतीकरण न झाल्यास प्रवासी वाहतुकीचे तीनतेरा वाजणार आहेत. तसेच महामार्गावरील वाहतुकीस धोकादायक ठरणार आहे. बाजारपेठेतील फ्लायओव्हरपासून काही अंतरावर असलेल्या चिमुकल्यांच्या शाळेचाही महामार्गाचे काम करताना पूर्णपणे विसर पडल्याचे दिसत आहे. शाळेसमोर अंडरपास उभारायचा राहून गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. माखजन आणि कुचांबेकडे जाण्यासाठी बायपासचे काम सुरू आहे. यासाठी दोन्ही बाजूंनी सर्व्हिस रोड काढण्यात आले आहेत. या सर्व्हिस रोडच्या मातीवर पाणी मारण्यात येत नसल्याने लोकांच्या डोळ्यात धूळ जात असून येथील व्यापारी आणि प्रवासी धुळीमुळे त्रस्त झाले आहेत; मात्र कोणतीच दखल घेण्यात येत नाही. आरवली येथे बाजारपेठेतून जाणाऱ्या महामार्गावर फ्लायओव्हर बांधण्यात येणार आहे. यामुळे व्यापारी तसेच छोटे-मोठे दुकानदार यांचा व्यवसाय उद्ध्वस्त होणार आहे. सुरवातीला जमिनीचे संपादन करण्यात आले होते त्यापेक्षा अधिक जागेवर काम सुरू करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

याबाबत काही दुकानदार व्यापाऱ्यांनी ठेकेदार कंपनीच्या लोकांना विचारले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. महामार्गाच्या कामासाठी जो प्लॅन तयार करण्यात आला त्या प्लॅनला अनुरूप काम व्हायला हवे होते; मात्र आता प्लॅननुसार काम होत नसल्याचे होणाऱ्या कामावरून दिसून येत आहे.

ग्रामस्थ व व्यापाऱ्यांसाठी धोकादायक

आरवली येथे सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम हे ग्रामस्थ व व्यापाऱ्यांसाठी धोकादायक आहे. चौकात जी उपाययोजना करायला हवी होती ती करण्यात न आल्याने हे ठिकाण सध्या वाहतुकीसाठी धोकादायक झाले आहे. आरवली हे परिसरातील चाळीस-पन्नास गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी दिवसभर वर्दळ असते. पावसाळा तोंडावर असल्याने प्रशासनाने याबाबत दखल घेऊन उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.