सांगली लोकसभा

सांगली लोकसभा

सांगलीत ‘विशाल’ विजय
सकाळ वृत्तसेवा
सांगली, ता. ४ ः सांगली लोकसभेची चुरशीची जागा जिंकत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी भाजपचे संजय पाटील आणि महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील या दोघा मल्लांना सपशेल चितपट केले. सुमारे लाख मतांची आघाडी घेत त्यांनी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांचा वचपा काढत भाजपची इथली हॅट्‌ट्रिक हुकवली. टपाली मतांपासून आघाडी घेत ‘विशाल’ यांचा अश्‍वमेध सुरू झाला. नवव्या फेरीअखेर त्यांनी चाळीस हजारांची आघाडी घेतली होती. सरासरी पाच हजारांचे प्रत्येक फेरीला मताधिक्य त्यांना मिळताना दिसत होते. जे कायम राहिले तर त्यांचा विजय लाखांहून अधिक मतांचा असेल, असे दुपारी बारापर्यंतचे चित्र होते.
२०१४ च्या मोदी लाटेत पहिल्यांदा काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली मतदारसंघात काँग्रेसचा पराभव झाला. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजपचे संजय पाटील यांनी विजय मिळवला, मात्र तेव्हा सुमारे दीड लाखांचे त्यांना मताधिक्य होते, मात्र यावेळी विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून मिळवलेली ३ लाख ४२ हजार मते जिल्ह्यातील काँग्रेस आणि विशाल पाटील यांची मजबूत ताकद दाखवून देणारी होती. त्यानंतर गेली पाच वर्षे विशाल यांनी जिल्ह्यात संपर्क कायम ठेवत आपण शर्यतीत कायम आहोत, असा संदेश दिला होता; मात्र राज्यातील ‘मविआ’चे सत्तांतर आणि शिवसेना आणि त्यानंतर राष्ट्रवादीची झालेली उभी शकले यानंतर जागावाटपाचा तिढा तयार झाला. विशेषतः कोल्हापूरमधील ‘स्ट्रॅन्डिंग’ खासदाराची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने सांगलीची जागा शिवसेनेच्या वाट्याला जाणार, अशी चर्चा सुरू झाली. जागांची ही अदलाबदल काँग्रेसच्या खच्चीकरणासाठी असल्याची चर्चा मतदारसंघात पोहोचली. त्यातून तयार झालेले बदलाचे वारे विशाल यांना विशाल विजयापर्यंत नेऊन ठेवणारे ठरले. गेल्या पंधरा दिवसांपासून विशाल यांच्या विजयाबाबत होणारी सार्वत्रिक चर्चा हे केवळ हवा की निश्‍चित बदल, याबद्दल कालपर्यंतच्या चर्चेवर आज पहिल्या फेरीपासून पाणी पडले आणि विशाल यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेली निर्णायक आघाडी उत्तरोत्तर वाढतच गेली. विशाल पाटील यांचा अपक्ष म्हणून झालेला विजय काँग्रेसला मोठे बळ देणारा ठरला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसला जिल्ह्यात अच्छे दिनाची चाहूल लागली आहे. विशेषतः सांगली व मिरजेत विशाल यांना मिळालेले मताधिक्य भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com