विट्यातील दोन मैत्रिणींनी बनवलेली हातमागावरची धनुशा साडी बनलीय फॅशन ब्रॅंण्ड  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A Sari made by two girl friends from Vita became a fashion brand

ऍड. शाहीन पिरजादे-तारळेकर व धनश्री दिलीप शिंदे या मैत्रिणींनी कलात्मकतेचा वापर करून निर्माण केलेल्या या उत्पादनाला फॅशन ब्रॅण्ड बनला असून, जिल्ह्यासह राज्यातील विविध शहरांतून त्याला प्रतिसाद मिळत आहे. 

विट्यातील दोन मैत्रिणींनी बनवलेली हातमागावरची धनुशा साडी बनलीय फॅशन ब्रॅंण्ड 

विटा ः विटा शहरात हातमागावर साड्या तयार केल्या जात. एकेकाळी विटा त्यासाठीच प्रसिद्ध होते. मात्र, नंतर काळाच्या ओघात त्यात खंड पडला. सध्या मात्र शहरात या खणसाडीचीच चर्चा आहे. ऍड. शाहीन पिरजादे-तारळेकर व धनश्री दिलीप शिंदे या मैत्रिणींनी कलात्मकतेचा वापर करून निर्माण केलेल्या या उत्पादनाला फॅशन ब्रॅण्ड बनला असून, जिल्ह्यासह राज्यातील विविध शहरांतून त्याला प्रतिसाद मिळत आहे. 

दोघींपैकी एक वकील तर दुसरी इंटेरियर डिझायनर. दोघींचे व्यवसाय वेगळे; पण आवडीचे क्षेत्र फॅशन डिझायनिंग. त्यांच्या नवीन प्रयोग करण्याच्या धडपडीतून जन्म झाला "धनुशा' खणसाडीचा. धनश्री शिंदे म्हणाल्या, ""धनुशा हे नाव दोघींच्या नावाच्या मिश्रणातून बनलेय. या खणसाड्या लोकप्रिय ठरल्यात. मागणी वाढतेय. छंद म्हणून सुरू केलेल्या नवसंकल्पनेचे रूपांतर ब्रॅंडमध्ये झालेय. ही साडी सर्व ऋतूंत वापरता येते. पारंपरिक हातमागावर बनलेल्या खणाला डिझायनर लूक दिला आहे. लोप होत

चाललेली हातमागाची उपयुक्तता, खणाची फॅशन बाजारात पुन्हा दिसत आहे.'' 
पॅच वर्क, बॉटम वर्क, डिझायनर पल्लू, रुप्फल, नथ प्रिंट, सरस्वती प्रिंट, पाटली पल्लू, हत्ती प्रिंट असे पर्यायीप्रकार खणसाडीत उपलब्ध केले आहेत. सर्व स्तरांतील महिलांना उपयुक्त ठरावे, म्हणून लहान मुलींसाठी खणाचे फ्रॉक, परकर-पोलकं, तरुणींसाठी खण दुपट्टा, खण-कुर्ती मागणीनुसार पुरवठा केला जातो. धनुशा ब्रॅंड ग्रामीण भागातही उपलब्ध करून दिला आहे.

ऑनलाईन जमान्याचा विचार करून "धनुशा'चे फेसबुक पेजही तयार केलेय. त्यासाठी आम्ही स्वतःच साड्या नेसून मॉडेल फोटोशूट केले. डिझायनर साड्या महाराष्ट्रासह सर्वत्र पोचल्या आहेत. अगदी अमेरिकेत राहणाऱ्या मराठी मुलींनी पुण्यात राहणाऱ्या आईला धनुशा साडी भेट दिली, असे त्यांनी सांगितले. 

खणसाडीला सर्वत्र पसंती मिळेल

विटा लेडीज बिझनेस असोसिएशनच्या प्रदर्शनात "धनुशा'ला चोखंदळ महिलांनी उत्तम प्रतिसाद दिला. धनुशा खणसाडीला सर्वत्र पसंती मिळेल आहे. 
- ऍड. शाहीन पिरजादे-तारळेकर

loading image
go to top