esakal | 'गोकुळ' मधून १५ दिवसाला महाडिक घेतात ८० लाखांचे भाडे; सतेज पाटीलांचा घणाघाती आरोप

बोलून बातमी शोधा

null

'गोकुळ' मधून १५ दिवसाला महाडिक घेतात ८० लाखांचे भाडे; सतेज पाटीलांचा घणाघाती आरोप

sakal_logo
By
धनाजी आरडे

गारगोटी (कोल्हापूर) : गोकुळ दूध संघाकडून दर पंधरा दिवसाला माजी आमदार महादेवराव महाडिक ८० लाखांचे टँकर भाडे घेतात. एक वर्षाला टँकर भाड्यातून त्यांना १९ कोटी रूपये मिळतात. यासाठी ते तीन-तेरा-तेवीस या दूध बिलांचा तारखांचा प्रचार करीत आहेत. ते दूध उत्पादकांसाठी नव्हे तर स्वत:चे टँकर सुरू राहावेत या स्वार्थासाठी फिरत आहेत. त्यांचा खरा चेहरा जनतेला समजला पाहिजे. यासाठी त्यांनी 'गोकुळ' २० वर्षात किती टँकर भाडे मिळविले हे जाहीर करावे, असे आव्हान गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाडिक यांनी दिले. कूर (ता. भुदरगड) येथे 'गोकुळ' च्या निवडणुकीनिमित्त राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतर्फे उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित ठरावधारकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार के. पी. पाटील प्रमुख उपस्थित होते. मंत्री श्री. पाटील म्हणाले, महाडिकांच्या टँकरचे मालक त्यांची मुले व कंपनी आहे. त्यांच्या सत्ताधारी आघाडीला विजयाची खात्री आहे मग ती निवडणूक पुढे ढकलण्यासाठी न्यायालयात का जात आहे. विरोधी आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर होईपर्यंत त्यांना आघाडीच्या उमेदवारांची नावे का जाहीर करता आली नाहीत.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, 'गोकुळ' मध्ये आनंदराव पाटिल-चुयेकर यांच्या कालावधीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सहकार्य केल्याने गोकुळचे दूध मुंबईत विक्रीस गेले. ताराबाई पार्कातील जागा नाममात्र भाडेतत्वावर मिळाली. याउलट महाडिकांनी टेंडरमध्ये सुद्धा पैसे मिळविले. मुंबईतील वितरकांकडून कमिशन घेतले. गोकुळमधील सत्ताधार्यांची घाण काढून टाकूया आणि दूध उत्पादकांची सत्ता आणूया.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीच्या विजयात भुदरगडचा सिंहाचा वाटा असेल. यासाठी सर्वांनी प्रामाणिक राहून बुद्धीभेद करणाऱ्यांना रोखूया. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, भुदरगडमधील ठरावधारक राष्ट्रवादीतील गद्दारांना त्यांची जागा दाखवून देतील. एक-एक मत मागणाऱ्यांना घरात नव्हे तर दारातसुद्धा घेऊ नका. या निवडणुकीत आमदार आबिटकर आणि मी एकमेकांच्या डोक्यावर हात ठेऊन शपथ घेतो आणि भुदरगडच्या विचारांचे ऐक्य दाखवू देतो. दत्तात्रय उगले यांनी प्रास्ताविक केले. रणजित पाटील यांनी उमेदवारांची ओळख करून दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, उपाध्यक्ष मधुकर देसाई, के. जी. नांदेकर, बी. एस. देसाई, सुनील कांबळे, सचिन घोरपडे, प्रा. बाळ देसाई, शामराव देसाई, आर. व्ही. देसाई, सभापती कीर्ती देसाई, जि. प. सदस्य जीवन पाटील, सदस्या रोहिणी आबिटकर, प्रकाश पाटील, यशवंत नांदेकर यांच्यासह आघाडीचे सर्व उमेदवार व ठरावधारक उपस्थित होते. विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.

Edited By- Archana Banage