esakal | महाविकास आघाडीतील नेते मुश्रीफांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार
sakal

बोलून बातमी शोधा

minister hasan mushrif comment on banti patil kolhapur

महाविकास आघाडीतील नेते मुश्रीफांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारख्या सामान्य जनतेच्या हृदयात स्थान असणाऱ्या नेत्याला विनाकारण अडचणीत आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. आजपर्यंत अनेक संकटे ताकदीने परतवणारे मंत्री मुश्रीफ या आरोपांच्या संकटावर तितक्याच ताकदीने मात करतील. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे पत्रक पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.

पत्रकात म्हटले आहे, राजकारणात प्रत्येक पक्षाने सत्तेचे स्वप्न पाहणे, हे क्रमप्राप्त आहे. गेल्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर तीन पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली. त्यापूर्वी भाजपनेही सत्तेत येण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या मार्गांनी केला. आता साधारणपणे दोन वर्षांचा काळ गेल्यानंतर महाराष्ट्र सारख्या प्रगतिशील आणि सक्षम राज्याची सत्ता आपल्याकडे नाही, याचे शल्य त्यांना आहे. त्यातूनच महाविकास आघाडीतील नेत्यांना विविध मार्गाने ‘लक्ष्य’केले जात आहे.

लोकशाहीत महाराष्ट्रातील लोकांनी जो निर्णय दिलेला आहे, त्याच्या अनुसरून आमदारांनी आणि तीन राजकीय पक्षांनी निर्णय घेतला आणि सत्ता स्थापन केली. राजकारणात ही गोष्ट मनाचा मोठेपणा दाखवून विरोधकांनी मान्य करायला हवी, असे मला वाटते. मंत्री मुश्रीफ यांच्या बाबतीत जे काही घडते आहे, ते दुर्दैवी आहे. सामान्य माणसाशी नाळ जुळलेल्या त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने गेली चाळीस वर्ष राजकारणापलीकडे जाऊन समाजकारणाचा वसा घेतला आहे. सामान्य माणसासाठी त्यांच्या घराचा दरवाजा भल्या पहाटेपासून उघडा असतो; पण त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचे मन निश्चितपणे व्यथित होऊ शकते.

राजकीय निवडणुकीमध्ये आरोप-प्रत्यारोप होतच राहतात; परंतु निवडणूक झाल्यानंतर एकदा जनतेने निर्णय दिल्यानंतर एखाद्या लोकप्रतिनिधीच्या व्यक्तिगत मागे लागणे, हे महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. मंत्री मुश्रीफ यांच्याबाबत अशा सगळ्या प्रकरणांमध्ये यापूर्वीच अनेक चौकशा झालेल्या आहेत.

बदनामीचा प्रयत्न चुकीचा

मंत्री मुश्रीफ यांची प्राप्तिकर खात्याकडून विधानसभा निवडणुकीच्या अगोदर चौकशी झाली आहे. या सगळ्या चौकशीचे निरसन ज्या त्या वेळी झाले आहे. ही माहिती नियमानुसार वेब साईटवर उपलब्ध आहे. अशा वेळी पुन्हा त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. मंत्री मुश्रीफ सर्व आरोपातून निश्चितपणे बाहेर पडतील, असा विश्वास आहे. सर्वसामान्य जनतेचा नेता असलेले मंत्री मुश्रीफ यांच्या पाठीशी या काळामध्ये आम्ही कणखरपणे उभे आहोत.

loading image
go to top