esakal | गांधीनगर बाजारपेठेची सुरक्षा रामभरोसे
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर बाजारपेठेची सुरक्षा रामभरोसे

गांधीनगर बाजारपेठेची सुरक्षा रामभरोसे

sakal_logo
By
प्रवीण जाधव - सकाळ वृत्तसेवा

गांधीनगर : येथे आणि परिसरात झालेल्या चोऱ्यांमुळे व्यापारपेठ पुन्हा चर्चेत आली. चोरी होऊ नये, यासाठी उपलब्ध असणारे तंत्रज्ञान आणि व्यवस्था वापरण्याची जबाबदारी कोणीही पाळत नाही. भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, यासाठी सजग होणे गरजेचे आहे.

गांधीनगर मोठी बाजारपेठ आहे. यात दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. होलसेल बाजारासाठी प्रसिद्ध असलेल्या बाजारपेठेत किरकोळ विक्रीही मोठी होते. कपडेच नव्हे तर इतरही वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी या बाजारपेठेचा लौकिक वाढत आहे. व्यापाराच्या बाबतीत दक्ष असणारे व्यापारी सुरक्षेच्या बाबतीत मात्र पुरेसे लक्ष देत नसल्याचे चित्र आहे. येथील लोहिया कंपाउंडमध्ये सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. यात सुमारे ३०० दुकाने आहेत. परंतु, येथे एकही सुरक्षारक्षक नाही. बहुतांश दुकानांच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. परंतु, ऐनवेळी हे कॅमेरे बंद असतात. दुकानांच्या बाहेर असणारे ट्यूबलाईट आणि बल्ब बंद असतात. या सर्व गोष्टी पाहता येथील व्यापारी सुरक्षेच्या बाबतीत गंभीर नसल्याचे चित्र आहे. गांधीनगर परिसरात बहुतांश ठिकाणी कमी जास्त प्रमाणात अशीच स्थिती आहे. चोऱ्या कमी होण्याच्या दृष्टीने प्रशासन, पोलिस यंत्रणेबरोबर व्यापाऱ्यांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा: अंबाबाई मंदिरात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन;पाहा व्हिडिओ

हे करणे शक्य आहे

  • सीसीटीव्ही बसविणे

  • सुरक्षारक्षक नेमणे

  • परिसरात योग्य अंतरावर ट्यूबलाईटची व्यवस्था

"गांधीनगर बाजारपेठेत सीसीटीव्ही, सुरक्षा रक्षकांची गरज आहे. सर्वांनी एकत्रित येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे"

- अशोक टेहल्यानी, उपाध्यक्ष, होलसेल व्यापारी असोसिएशन, गांधीनगर.

"एवढ्या मोठ्या बाजारपेठेमध्ये सीसीटीव्ही, सुरक्षारक्षक या प्राथमिक गोष्टी आहेत. व्यापाऱ्यांची बैठक घेऊन याबाबत त्यांना आवाहन करणार आहे."

- सत्यराज घुले, सहाय्यक पोलिस निरीक्षक, गांधीनगर.

"गांधीनगर परिसराला लागून गडमुडशिंगी ग्रामपंचायतीने सुमारे १०५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत; परंतु या सीसीटीव्हीला आवश्यक डीव्हीआर बसविण्यासही व्यापारी सहकार्य करत नाहीत. काही ठिकाणचे डीव्हीआर बंद केले जातात."

-तानाजी पाटील, उपसरपंच, गडमुडशिंगी

loading image
go to top