Shahu Mill: दसऱ्या दिवशी नारळ फोडला अन् कोल्हापुरात कापड उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली | Kolhapur News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shri Shahu Chhatrapati Mills | Kolhapur News

शाहू मिलचा नारळ फोडला अन् कोल्हापुरात कापड उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली

कोल्हापूर म्हणजे छत्रपती शाहु महाराजांची नगरी. इथली संस्कृती, इथला इतिहास, इथले पर्यटन, शिक्षण, उद्योगनगरी अशा सगळ्या गोष्टी शाहु महाराजांच्या स्पर्शाने परिस झाल्या आहेत. त्यांच्यामुळेच त्यांनी उभं केलेलं हे शहर आज जगभरात नावारुपाला आलेलं आहे. कोल्हापूरमध्ये शाहु महाराजांनी केलेल्या प्रत्येक कार्याचा एक वेगळा इतिहास आहे. यातीलच उद्योगाचा आणि त्यातही कापड उद्योगाचा इतिहास आज वाचणार आहोत. (Shahu Maharaj Memorial Centenary Year)

१९०६ मध्ये छत्रपती शाहू राजांनी उद्योगधंद्यांच्या क्षेत्रात कोल्हापूर संस्थानात सर्वात मोठा कापड निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला. 'दि. शाहू छत्रपती स्पिनिंग अॅंड विव्हिंग मिल्स' या गिरणीची स्थापना त्यांनी केली. या प्रकल्पासाठी कोल्हापूर संस्थानात शाहू राजांनी विस्तीर्ण जागा, पाण्याचे तळे आणि तब्बल ५० हजार रुपयांचे भांडवल उपलब्ध करुन दिले होते. राजांच्या या निर्णयामुळे कोल्हापूर संस्थानातील त्याकाळच्या शकडो लोकांना रोजगार उपलब्ध झाला होता. इतकेच नाही तर अखंड हिंदुस्थानच्या कापड उद्योगाच्या नकाशावर ठळकपणे कोल्हापूर हे नाव दिसू लागले होते.

२७ सप्टेंबर १९०६ साली दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर या गिरीणीचे उद्घाटन झाले आणि कापड उद्योगात कोल्हापूरने आपला ठसा उमटवायला सुरुवात केली होती. विजयादशमीच्या दिवशी मराठे नवा मुलूख जिंकण्यासाठी विजयी मोहिमेवर निघत असत. छत्रपती शाहूंनी या उद्योगाच्या यशस्वितेसाठी माझे संपूर्ण सहकार्य राहील असे वचन जनतेला दिले होते. त्यासोबत कोणत्याही परिस्थितीत हा चालु केलेला उद्योग बड्या गिरणी मालकांच्या आणि धनिकांच्या ताब्यात जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी कोल्हापूरच्या लोकांनी दक्ष राहिले पाहिजे आणि उद्योगात यश संपादन केले पाहिजे. जगाला हे समजून चुकायला हवे की : Mercantile talents are not a monopoly of Bombay alone!

यानंतर संस्थानातील शिरोळ, इचलकरंजी, गडहिंग्लज या ठिकाणी जिनिंग फॅक्टरींच्या स्थापना झाल्या. साधारण १९१३ च्या सुमारास संस्थानातील पहिली ऑईल मिल, पहिली सॉ मिल, इलेक्ट्रॉनिक कंपनी, पहिली फाऊंड्री फॅक्टरी, मोटार ट्रान्सपोर्ट कंपनी फॅक्टरी असे अनेक उद्योग सुरु झाले. निरनिराळ्या उद्योगासाठी प्रशिक्षित कामागार तयार व्हावेत म्हणून 'राजाराम इंडस्ट्रियल स्कूल'ची स्थापन करण्यात आली.

संस्थानाबाहेरच्या उद्योजकांनीही महाराजांनी त्यांच्या व्यवसायात वाढीसाठी मदत केल्याची उदाहरणे अनेक संदर्भात सापडतात. त्यात मुंबईचे सरदारगृहाचे मालक विश्वनाथ साळवेकर व किर्लोस्कर कारखान्याचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या नावाचा प्रामुख्याने समावेश होतो. शाहू महाराज अनेकांना सढळ हाताने मदत करत होते. यातून त्यांच्या घराण्याचे आणि महाराज असण्याची अहंकारी वृत्ती कधीच दिसून आली नाही, असेही अनेक ठिकाणी संदर्भासहित सांगितले जाते.

कोल्हापूर संस्थानात आणि संस्थानाबाहेर व्यापार आणि उद्योगधंदे यांच्या विकासाला चालना देण्याचे कार्य शाहू महाराज करत होते. १९०६ साली कापडगिरीणीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सहकार क्षेत्राचा पुरस्कार केला. त्यांच सहकार क्षेत्रातील कार्य हे अद्भूत आणि कौतुकास्पद होतं. सहकार तत्वाच्या आद्य पुरस्कर्त्यांपैकी शाहू महाराज एक होते. आणि ही गोष्ट अखंड महाराष्ट्राला भूषणास्पद होती. होऊ घातलेल्या बदलांच्या पार्श्वभूमीवर कारागिरांनीही आपापले परंपरांगत व्यवसाय टिकवण्याच्या दृष्टीने नव्या युगाचा 'सहकारा'चा मंत्र स्वीकारला पाहिजे, असा त्यांचा मानस होता.

पुढे जाऊन शाहू महाराजांनी आपल्या राज्यात १९१२ साली सहकारी संस्थाविषयक कायदा (Co-Operative Society Act) जारी केला. दुसऱ्याच वर्षी 'दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि.' ही पहिली सहकारी संस्था भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आली. पाहता पाहता १९२१ पर्यंत या संस्थांची संख्या ३७ वर पोहचली. आणि सहकार क्षेत्रात कोल्हापूरने जोरदार मुसंडी मारायला सुरुवात केली. आज सहकारी तत्वांवर चालणाऱ्या विविध उद्योगव्यवसायांमुळे कोल्हापूर जिल्हा हरितक्रांतीत आणि श्वेतक्रांतीत महाराष्ट्रात अग्रेसर आहे, आणि याचे सारे श्रेय हे छत्रपती शाहू राजांना जाते.

(संदर्भ - राजर्षी शाहू, पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ, खंड : एक, दोन आणि तीन)

(संपादक - डॉ. जयसिंगराव पवार आणि डॉ. मंजुश्री पवार)

Web Title: Shahu Chhatrapati Meals Establishment In Kolhapur Contribution Co Operative Memorial Centenary Year Special Article

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top