
सांप्रदायिक विचाराला खड्यासारखे बाजूला करा
कोल्हापूर - देशाचा वैचरिकदृष्ट्या नकाशा बदलण्याची गरज आहे. देशाची सत्ता ज्यांच्या हातात आहे, त्या सांप्रदायिक विचाराला खड्यासारखे बाजूला करून देश एकसंध ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आज येथील विराट सभेत येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभरात काढलेल्या परिवार संवाद यात्रेची सांगता कोल्हापुरात झाली. यानिमित्त तपोवन मैदानावर आयोजित संकल्प सभेने गर्दीचा उच्चांक मोडला. यावेळी पवार यांनी केंद्र सरकार, राज्यातील विरोधक यांच्यासह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर आपल्या शैलीत निशाणा साधला. श्री. पवार म्हणाले, ‘२०१४ पूर्वीची परिस्थिती वेगळी होती. मनमोहन सिंग यांचे सरकार होते, त्यावेळी देशासमोर असलेले प्रश्न एकत्रित सोडविण्याचे प्रयत्न झाले. अनेक क्षेत्रात उन्नती कशी होईल, याची खबरदारी घेतली.
२०१४ ची निवडणूक वेगळी झाली. भाजपाच्या हातात सत्ता आली, जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारला. मात्र, गेली काही वर्षे आपण पाहतोय सत्ता हातात आल्यानंतर त्या सत्तेचा उपयोग सर्वसामान्य लोकांच्या भल्यासाठी होईल, देशात एक वाक्यता राहील, लोकाचं दुःख कमी होईल, लोक एक विचाराने कसे राहतील, हे पाहण्याची जबाबदारी सरकारच्या प्रमुखांची असते; मात्र आजचे चित्र वेगळे आहे. माणसा-माणसांत अंतर निर्माण झाले आहे. आपण पाहतोय दिल्लीतील काही भागात हल्ले झाले आहेत, जाळपोळी होत आहेत. तेथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आहेत; मात्र तेथील गृहखाते दिल्लीच्या हातात नाही. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या हातात आहे. त्यांनी देशाची राजधानी एका विचाराने एकसंघ राहील, याची खबरदारी घेणे आवश्यक होते; मात्र ती घेतलेली नाही.
श्री. पवार म्हणाले, ‘दिल्लीत काही घडले तर त्याचा संदेश संपूर्ण जगात जातो आणि जगात या देशात अस्थिरता आहे, अशी भावना होते. तुमच्या हातात सत्ता आहे, मात्र तुम्हाला दिल्ली सांभाळता येत नाही. अशी परिस्थिती केवळ दिल्लीत नाही तर शेजारील कर्नाटकातही आहे. हुबळीसारख्या शहरात जातीय दंगली झाल्यात, अनेक धक्कादायक निर्णय या राज्यात होत आहेत. अल्पसंख्याकांविषयी अनेक धक्कादायक निर्णय होत आहेत. किराणा दुकानासमोर, हॉटेलसमोर ते अल्पसंख्यांकाचे असून तेथे खरेदी, जेवण करू नये, असे फलक लावण्यात आले. आणि हे सर्व करणारे लोकसत्ताधारी पक्षाचे आहेत. ज्या ज्या ठिकाणी भाजपशासित राज्य आहे, तेथे अशीच स्थिती आहे. त्यामुळे आपल्यासमोर आव्हानाची स्थिती निर्माण झाली आहे.’ कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी केल्याबद्दल श्री. पवार यांनी कोल्हापूरच्या जनतेचे आभार मानले. कोल्हापूरकर हुशार आहेत. महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत जातीय-धर्मांधतेचा वापर झाला; मात्र ही राजर्षी शाहूंची भूमी आहे. येथे समतेचा विचार रुजला आहे. येथे चुकीच्या विचाराला थारा दिला नाही. कोल्हापुरात प्रचार करताना एक विध्वंसक फिल्म दाखविण्यात आली आणि जातीय संघर्ष दाखवून मते घेण्याचा प्रयत्न झाला; मात्र जी फिल्म दाखविण्यात आली, त्यावेळी देशाची सत्ता व्ही. पी. सिंग यांच्या हातात होती. त्यांचे सरकार भाजपच्या सहकार्याने चालले होते. त्यावेळचे केंद्रीय गृहमंत्री भाजपच्या पाठिंब्यावर झाले होते, असे सांगत श्री. पवार यांनी वस्तूस्थितीचा विपर्यास करून मते मागण्याच्या प्रकाराला कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत दाद दिली नसल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘ही राजर्षी शाहूंची भूमी आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याची जबाबदारी आपणावर आहे; पण अलीकडे वातावरण गढूळ आणि दूषित करण्याचे काम काही शक्तींकडून केले जात आहे. काही शक्तींनी तुमच्या माझ्या राज्यात जातीद्वेषाचे राजकरण करण्यास सुरुवात केली आहे. यातूनच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरावर चालून जाण्याचा प्रयत्न झाला. हे अशोभनीय आहे. मागील दोन वर्षांत कोरोनाने थैमान घातले. अनेक संकटे आली. सरकार या संकटाशी दोन हात करीत आहे. राज्याचे आर्थिक चक्र ठप्प झाले आहे. अनेक कारखाने-उद्योग बंद पडले. बेरोजगारी वाढली आहे. या सर्व संकटांशी दोन हात करून त्यातून बाहेर येण्यासाठी सर्व ते प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी नेटाने उतरली होती. भाजपने या निवडणुकीच्या प्रचारात जाती-धर्माचा वापर केला. मात्र, भाजपच्या या जाती-धर्माच्या राजकरणाला उत्तरच्या निकालाने चपराक दिली.’
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, ‘भाजपला स्वतः काही करता येत नाही, त्यासाठी ते बुजगावणी उभी करतात. शुक्रवारी परवा एस.टी.च्या संपात एक बुजगावणं उभे केले होते. आता दुसरे बुजगावणे महाराष्ट्रात भोंगा वाजवायला लागलंय.’ या भोंगा वाजविणाऱ्यांना २०१९ च्या निवडणुकीत केवळ सव्वा दोन टक्के मते पडली होती, असे सांगून त्यांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला. सगळ्या भारतातील जनतेचा डीएनए एक आहे. असे उशिरा का होईना हे त्यांना कळाले, ही चांगली गोष्ट आहे. पण मागास समाजाच्या आरक्षणाला विरोध का करता, असे सांगत भाजपने मराठा आरक्षण असो, ओबीसी आरक्षणात खोडा घातला. जर तुम्ही डीएनए एक आहे असे म्हणत असाल तर मग तुम्ही आरक्षणाला विरोध का करता? ओबीसी व मराठा आरक्षणाला तुमचा विरोध का? तुमची कृती मागास लोकांसाठी अडथळ्यांची आहे, असेही ते म्हणाले. ते म्हणाले की, महागाईचा कहर झाला आहे. त्यामुळे दिशा भूल करण्यासाठी लोकांची माथी भडकवायची आणि मूळ मुद्द्यांवरून दुसऱ्याच मुद्द्यावर न्यायचे, अशी त्यांची रणनीती आहे. मात्र, आपण वज्रमुठ करावी; छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वाटेवरून जाणारा महाराष्ट्र शरद पवार यांच्या मागे आहे. तो दिल्ली पुढे कधीही झुकणार नाही. शरद पवार यांच्यावर टीका करणे फॅशन झाली आहे.’ निवडणुकीवेळी समोर पैलवान नाही, मी पुन्हा येणार असे ते म्हणत होते. मात्र, ते समोर येत नाहीत. घरात बसून एका पाठोपाठ एक ट्विट करतात असा टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच नाव न घेता पाटील यांनी लगावला.
माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल म्हणाले, की पवार राज्याचे नव्हे तर देशाचे नेते आहेत. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेक वेळा पवारांसोबत चर्चा केली आहे. ८० वर्ष ओलांडूनही तरुणांना लाजवेल असे काम श्री. पवार करीत आहेत. त्यांच्यापासून मोठी ऊर्जा मिळते. कोविड महामारीतही अविश्रांतपणे शरद पवार यांनी राज्याच्या कानाकोपऱ्या जावून मदत करीत होते. गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्या विचाराने चाललेला देश धर्मांधतेकडे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे. गौतम बुद्ध व महात्मा गांधी यांचा असलेल्या या देशाची परिस्थिती २०१४ नंतर बदलू लागली आहे. धर्मांधतेवर देश उभा राहिला तर कसा रसातळाला जातो, याचे उदाहरण म्हणजे पाकिस्तान आहे, असेही श्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
त्यांना कोल्हापूरने धडा शिकविला!
कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या सर्वांनी जो उमेदवार पुढे केला, त्याला मोठ्या मतांनी विजयी केले. तुमच्या सगळ्यांच्या या उत्तम भूमिकेचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो. निवडणुकीत मत मागण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे; पण मत मागताना, कुणी तरी सिनेमा काढला, तोही काश्मीर विषयावर. अतिरेक्यांनी त्याठिकाणी राहणाऱ्या पंडितांवर हल्ले केले, त्या वर्गाला देशाच्या अन्य भागात जावे लागले. ती फिल्म याठिकाणी दाखवण्यात आली. यामागे जातीय संघर्ष व्हावा, त्यातून मतांचा जोगावा मागता यावा, हा डाव होता. मात्र, कोल्हापूरच्या सूज्ञ लोकांनी तो डाव करणाऱ्यांना धडा शिकवल्याचे श्री. शरद पवार यांनी सांगितले.’
Web Title: Sharad Pawar Speak On Central Goverment In Kolhapur Sabha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..