
Bangalore : शिवकुमारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची रणनीती
बंगळूर- माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह सीडी कटाचे राजकीय फासे टाकण्यासाठी भाजप नेते तयार झाले आहेत. केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याची रणनीती आखण्यात येत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना चर्चा करण्यासाठी दिल्लीत बोलाविले आहे.
रमेश जारकीहोळी यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सीबीआय तपासासाठी त्यांच्यावर दबाव आणल्यानंतर बोम्मईना दिल्लीत येण्याची सूचनानेत्यांनी केली आहे. बोम्मई उद्या (ता. ५) दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे.
सीडी प्रकरणाचा वापर करून शिवकुमार यांना अडकवून ठेवण्याचा भाजप नेत्यांचा विचार होता. त्यानुसार रमेश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिवकुमार यांच्यावर यांच्यावर आरोप केले. यामागे भाजप नेत्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. शहांनी जारकीहोळी यांचे म्हणणे ऐकून घेतले. सर्व काही कायद्यानुसार करू. थोडा धीर धरा, असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.
सीडी कटात केपीसीसीचे अध्यक्ष शिवकुमार यांच्या सहभागाचा आरोप असल्याने त्यांना कायदेशीर जाळ्यात आणून त्यांच्या प्रचाराला ब्रेक लावला जाण्याचीही चर्चा आहे. हे दोन्ही नेते त्याबाबत चर्चा करतील. आणि शेवटी सीबीआयकडे प्रकरण सोपवण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा अद्याप अधिकृत झालेला नाही.