esakal | सिंधु-रत्न योजना अखेर साकारली, अर्थसंकल्पात  300 कोटींची तरतूद
sakal

बोलून बातमी शोधा

0

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे  `चांदा ते बांदा' त रखडलेली कामेही मार्गी लागणार आहेत.

सिंधु-रत्न योजना अखेर साकारली, अर्थसंकल्पात  300 कोटींची तरतूद

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) : राज्याच्या अर्थसंकल्पात सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठीच्या `सिंधु-रत्न` योजनेसाठी 300 कोटींची तरतूद करण्यात आली. यातून नवनवीन विकासात्मक उपक्रमांबरोबरच चांदा ते बांदा योजनेतील प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यात येणार आहेत. यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळण्यास मदत होणार आहे. गतवर्षीच्या फेब्रुवारीत मुख्यमंत्र्यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात सूतोवाच केलेल्या या योजनेला आर्थिक तरतुदीमुळे पूर्णत्व आले आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या आंगणेवाडी यात्रेसाठी जिल्ह्यात आले होते. या वेळी त्यांची जिल्ह्यात मिनी मंत्रिमंडळ बैठक झाली होती. या वेळी त्यांनी यापूर्वीच्या सरकारची चांदा ते बांदा ही योजना बंद करण्यात आली असून सिंधु-रत्न विकास ही नवीन योजना दोन जिल्ह्यासाठी सुरू करीत असल्याचे घोषित केले होते; मात्र त्यानंतर वर्ष उलटले तरी प्रत्यक्षात काहीच नव्हते. त्यामुळे विरोधकांकडून आरोप होत होते. जानेवारीमध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या सिंधु-रत्न योजनेला मंजूर करण्यात आली होती. 

सोमवारी अर्थसंकल्प जाहीर करताना अर्थ व नियोजन मंत्री अजित पवार यांनी सिंधु-रत्न विकास योजनेला मंजुरी देण्यात येत असल्याचे सांगत 300 कोटी रुपये या योजनेला नियोजित करण्यात असल्याचे स्पष्ट केले. 

सिंधु-रत्न ही योजना कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांतील रखडलेल्या योजना व विकास यांना चालना मिळणार आहे. चांदा ते बांदा या योजनेत प्रलंबित राहिलेल्या प्रस्तावांना मंजूरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार
"जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या कामाला आता गती मिळणार आहे. सिंधुदुर्गमध्ये पर्यटन विकासासाठी आणि मच्छीमारांसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे. बस स्थानकांच्या अपूर्ण कामांसाठीही तरतूद केली आहे. जलसंधारणच्या छोट्या प्रकल्पांसाठी देखील भरीव निधीची तरतूद झाली आहे. याचा फायदा शेतकरी व नागरिकांना होणार आहे. रेवंडी ते रेडी जाणाऱ्या कोस्टल रोडसाठी देखील या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या वेगवेगळ्या विषयांसाठी निधीची तरतूद करून जिल्ह्याच्या विकासाला चालना दिल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांचे आम्ही आभारी आहोत, असे आमदार वैभव नाईक म्हणाले. 

loading image