...म्हणून आम्ही सोडली मुंबई!

...म्हणून आम्ही सोडली मुंबई!

कोल्हापूर : नोकरीची अनिश्‍चितता आहे, खिशातले पैसे संपले आहेत. चाळीतले निम्मे लोक चाळ सोडून आपल्या गावी गेले आहेत. अख्ख्या मुंबईत शुकशुकाट आहे. मुंबईतले मोकळे रस्ते बघितले तरी भीती वाटते, अशा परिस्थितीत आम्हाला आमच्या घरची, गावची, आठवणच क्षणाक्षणाला येत राहिली. रोजगार, पोराबाळांच शिक्षण भविष्यातले संकल्प सारे मुंबईत सोडून आम्ही गावाकडे आलो 
आणि आम्ही मुंबईहून आलो म्हणजे सोबत कोरोना घेऊनच आलो, अशा नजरांनी आम्हाला येथे टोचले जात आहे; पण आम्ही मुंबई का सोडली, याचा कोण विचार करणार आहे की नाही?..असा उद्विग्न सवाल मुंबईहून शाहूवाडी, भुदरगड, आजरा, गगनबावडा, राधानगरी तालुक्‍यात आलेले मुंबईकर करत आहेत. 
मुंबई-पुणे या रेड झोनमधून मोठ्या संख्येने लोक कोल्हापुरात आले. वैद्यकीय चाचणीत त्यातले आजअखेर दीडशे जण कोरोनाबाधित सापडले. साधारण वीस ते पंचवीस हजार लोक मुंबईहून आले. त्यातले 150 कोरोनाग्रस्त सापडले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्यासोबत असलेल्यांना क्वारंटाईन केले गेले आहे. पण, मुंबईहून हे लोक येथे आले म्हणून कोल्हापूरचे आरोग्य धोक्‍यात आले, असा बहुतेकांचा सूर आहे आणि मुंबईहून आलेले हे लोक इतरांच्या टोकदार नजरांचे लक्ष्य झाले आहेत. अतिशय अस्वस्थतेच्या वातावरणात शाळेत, देवळात, सार्वजनिक हॉलमध्ये क्वारंटाईन आहेत. एखाद्या कैद्याला जसे लांबून बघतात, तसे क्‍वारंटाईनच्या ठिकाणाकडे येणारे जाणारे बघत आहेत. 
चांदोलीचा अभिजित पाटील (वय 22) हा एकटाच विद्यामंदिर चांदोली या शाळेत आहे. तो ठाण्याहून आला आहे. 14 मे रोजी त्याचा स्वॅब घेतला आहे. आज आठ दिवस झाले, त्याचा अहवाल नाही, त्याची आई रोज डबा घेऊन येते. लांब शाळेच्या फाटकाजवळ डबा ठेवते. हा शाळेच्या व्हरांड्यात उभारतो. आई शाळेच्या फाटकात उभी राहते. दोघे एकमेकाला पाहतात. आई लांब गेल्यावर हा डबा उचलून घेतो. या अभिजितला जेवण खाण्यापेक्षा क्‍वारंटाईन संपल्यावर आईच्या गळ्यात पडायचे आहे. पण, या क्षणी तो मुंबईहून आलेला म्हणून गावकऱ्यांच्या दृष्टीने संशयित आहे. अभिजितचा दिवस शाळेच्या व्हरांड्यात बसून झोपून जातो. पण, रात्री शाळेचा व्हरांडा भयान वाटू लागतो. पण, अभिजित क्वारंटाईन आज ना उद्या संपणार, या आशेवर आहे. 

अंकुश आळसे हे वाळूरचे. मुंबईत भाजी मंडईत हमालीचे काम करतात. रोज रात्री आठला कामावर व दुपारी बाराला घरी परत असे त्यांचे जगणे आहे. मुंबई थांबली. यांची रोजची कमाई थांबली. घरी बसून कसाबसा महिना काढला; पण तेथून पुढे हात-पाय हालवायलाही संधी नाही. छोट्या खोलीत दिवसरात्र बायको पोरांसह बघून बघून जीव कंटाळला. नेहमी गजबजलेली मुंबई बघत होतो. पण, शांत शुकशुकाट असलेली मुंबई अंगावर आल्यासारखी वाटू लागली. आम्ही 20 जणांनी पास काढून मुंबई सोडली. आता गावाबाहेर शेतातील घरात क्‍वारंटाईन आहे आणि काही जण मी जणू मुंबईहून येताना कोरोना घेऊनच आलो, अशा नजरेने पाहत आहेत. 
संजय पाटील हे शिवारेचे. कल्याणमध्ये भाजी विकतात, रस्ते मोकळे. भाजीला गिऱ्हाईक नाही. शिल्लक पैसे संपले. कोरोना कधी हटणार माहीत नाही. त्यामुळे कुटुंबाने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला. अधिकृत पास घेऊन कोल्हापुरात आले. यांचा स्वॅब 14 तारखेला घेतला आहे. आज आठ दिवस झाले. रिपोर्ट नाही, रिपोर्ट काय असेल या चिंतेने आठ दिवस डोळ्याला डोळा नाही. त्यातच मुंबईकर म्हणून संशयाची नजर. त्यामुळे ते खूप अस्वस्थ आहेत. आमच्या जागी तुम्ही आहात, असे समजून विचार करा, एवढेच त्यांचे म्हणणे आहे. 


मुंबईहून रितसर वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करून गावी कोणी येणे हे चूक नाही. संकटाच्या काळात कोणालाही आपले घर, गाव याचीच आठवण होणार. शाहूवाडी तालुक्‍यात मुंबई किंवा बाहेरून आलेले 30 हजार जण आहेत. त्यांचे योग्य क्वारंटाईन केले आहे. त्यांनीही संसर्ग रोखण्यासाठी असलेले नियम काटेकोरपणे पाळावेत. गावकऱ्यांना सहकार्य करावे. 
- बी. आर. माळी, प्रांताधिकारी, शाहूवाडी. 


बाहेरून गावात येणारा प्रत्येक जण कोरोनाबाधित नाही. परवानगी घेऊन आरोग्य तपासणी करून येणाऱ्यांना क्वारंटाईन केले जात आहे. एकावेळी लोक मोठ्या संख्येने आल्याने रुग्णसंख्या मोठी झाली आहे. या लोकांनी संसर्ग टाळण्यासाठी पूर्ण खबरदारी घ्यावी, एवढाच प्रशासनाचा आग्रह आहे. 
- डॉ. संपत खिलारी, प्रांताधिकारी, भुदरगड. 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com