esakal | विटा करतच लावतात जीवनाला थर...

बोलून बातमी शोधा

Video - विटा करतच लावतात जीवनाला थर...
Video - विटा करतच लावतात जीवनाला थर...
sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : बापट कॅंपच्या परिसरात तीन वीट भट्ट्यांवर वीसहून अधिक कुटुंबे राबतात. विटांनी रचलेल्या भिंती, छतावर अंथरलेला प्लास्टिक कागद, पत्र्याचा दरवाजा, या रचनेतील त्यांची घरे, रात्रीच्या अंधारात इथे दोन मिनिटे उभे राहणंही मुश्‍कील ठरते, इतके या परिसरात डासांचे साम्राज्य आहे. पिण्याच्या पाण्यासाठी घागरी व बादल्या घेऊन महिलांना रात्रीच नळापुढे थांबावे लागते. त्याबद्दल फारशी तक्रार न करता त्या कुटुंबात रमल्या आहेत. रोज केलेल्या विटांवर त्यांची मजुरी ठरते. उद्या किती विटा करायच्या, या विचारांचं चक्र त्यांच्या डोक्‍यात नित्यनेमाने सुरू आहे.

मनमाड, औरंगाबाद, गाणगापूर, वाडगाव, अहमदनगर येथून ही कुटुंबे ऑक्‍टोबरमध्ये कोल्हापुरात आली आहेत. पंचगंगेच्या महापुरात बुडालेल्या घरांतील कचरा बाहेर काढण्याचे त्यांचे काम असते. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ते येथे परतले. एक दांपत्य दिवसांत पाचशे विटा तयार करते. एक वीट एक रुपये, असा त्यांच्या मजुरीचा दर आहे. माती कालवून विटा तयार करण्याची त्यांची लगबग सकाळी सुरू होते. त्यासाठी ही कुटुंबे पहाटेच उठतात. जेवण आटोपून आठ वाजता कामात गुंतवून घेतात.

वीट तयार करून उन्हात आठ-नऊ दिवस ठेवल्यानंतर भट्टीसाठी तयार होते. भाताचे तूस, बगॅस, दगडी कोळशात त्या भाजण्यासाठी ठेवल्या आहेत. दिवसभराचं काम पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी महिलांमध्ये जेवणाची व पाणी भरण्याची तयारी सुरू होते. भट्टीवर असलेल्या नळावर घागरी व बादल्या रांगेत ठेवण्यात येतात. यांच्या घरांत विजेची सोय असली तरी परिसरात मात्र अंधार आहे. तिथल्या परिसरातून ओढा वाहत असल्याने डासांचे साम्राज्य आहे. रात्री हे लोक झोपतात कसे, हाच प्रश्न आहे. संचारबंदीत काम थांबले तर काय होईल, याचा फारसा विचार न करता हे लोक दिवस ढकलत आहेत. कोणाच्याही घरात टीव्हीची सोय नाही. मोबाईलवरून गावाकडे आई-वडिलांची व नातलगांची चौकशी करण्यात मात्र ते विसरत नाहीत. या कामगारांचे प्रमुख सचिन बडे म्हणाले, 'कामावर देखरेख ठेवणे व माल संपला की, तो आणणे हे माझे काम आहे. संचारबंदीत त्याचा तणाव माझ्यावर आहे. मात्र, इथल्या वीटभट्टी कामगारांकडे पाहिले तर ते बिनधास्त आहेत.'

"मराठा विद्या प्रसारक महाविद्यालयातून मी अकरावीपर्यंत शिकलो. आर्थिक परिस्थितीमुळे मी या व्यवसायात अडकलो आहे. इथले काम आटोपले की, मेमध्ये गावी परतणार आहोत. तेथे कांद्याच्या शेतीत मी काम करेन."

- गोरख सोनवणे, वीटभट्टी कामगार