esakal | धरणीला पाठ टेकत भिडतात रोज नव्या आव्हानाला
sakal

बोलून बातमी शोधा

Video - धरणीला पाठ टेकत भिडतात रोज नव्या आव्हानाला

Video - धरणीला पाठ टेकत भिडतात रोज नव्या आव्हानाला

sakal_logo
By
संदीप खांडेकर

जगणं संचारबंदीतलं....!

कोरोनाच्या संचारबंदीने सर्वसामान्यांना घाम फुटलाय. कारण प्रश्न जगण्याच्या लढाईचा आहे. शासनाने विविध घटकांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी भटकणाऱ्यांच्या कानी मात्र 'पॅकेज' हा शब्द पडलेला नाही. रोजचा दिवस ढकलत जगायचं. तेही आनंदाने अन्‌ कोणतीही कुरकुर न करता, एवढंच त्यांच्या बोलण्यातून जाणवतं. विशेष म्हणजे त्यांचं संचारबंदीतलं जगणं, इतरांच्या आत्मविश्वासाला बळ देणारं आहे. अशा लोकांचा घेतलेला हा शोध...

कोल्हापूर : डोक्‍यावर तळपणारा सूर्य अन्‌ रखरखत्या उन्हात पोळणारं शरीर. घामाच्या धारा शरीरातून वाहत असताना त्याची पर्वा मात्र लमाण समाजाला बिलकुल नसते. दिवसभर डांबरीकरणात व्यग्र असलेले महिलांचे हात रात्री आमटीला फोडणी देण्यात गुंततात. चुलीला फुंकर मारत भात शिजवताना विस्तवाचे चटके सोसतात. पोटात घास गेल्यानंतर अंग टेकताच झोप कधी लागते, हेही त्यांना कळत नाही. पुन्हा पहाटे पाचला उठून कामाला जाण्याची त्यांची तयारी सुरू होते.

कोरोनाच्या संचारबंदीतलं या लोकांचं जगणं भलतंच वेगळेपण दाखवून देतंय. छोट्या राहुट्यांत, तर कधी अंगणातच धरणीला पाठ टेकत रोज नव्या आव्हानाला ते भिडतात. त्यामुळेच त्यांचा हा प्रवास इतरांच्या आयुष्यात आनंदाची पेरणी करणारा ठरत आहे. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. अप्पासाहेब पवार चौकातील युको बॅंकेमागे लमाण समाजाच्या राहुट्या गेल्या वर्षी दिवाळीत उभारल्या गेल्या. पंधरा कुटुंबे कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील बिळगी तालुक्‍यातून आली. कोल्हापूरपासून सुमारे दोनशे किलोमीटरपेक्षा हे अधिक अंतर. प्रत्येक कुटुंबात प्रत्येकी एक महिला व पुरुष. बच्चेकंपनीही सोबतीला आहे. ज्येष्ठांना व गरोदर महिलांना कामाच्या ठिकाणी आणायचे नाही, हा शिरस्ता आजही पाळला गेलाय.

सारे लोक कामाला गेले की, केवळ राहुट्यांवर नजर ठेवण्यासाठी एखादी ज्येष्ठ महिला आणली जाते. पारुबाई राठोड त्यापैकी एक आहेत. शासकीय कामे सुरू असल्याने इथल्या लोकांच्या शरीराला आराम ठाऊक नाही. शिवाजी विद्यापीठ, वसगडे, नेर्ली तामगावमधल्या रस्त्यांची कामे त्यांनी केली असून, आज शहरातल्या मार्केट यार्ड परिसरात सुरू असलेल्या कामावर ते रोज हजेरी लावत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना हे लोक कामात गुंतले आहेत. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी घरी परतल्यावर यांचं नवं जगणं समोर येते आहे. प्रकाशाविना यांची गैरसोय होऊ नये म्हणून बॅंकेने त्यांना वीजपुरवठा दिला आहे. राहुट्यांत ना टी.व्ही. ना रेडिओ. मजुरीतील बचतीतून घेतलेल्या मोबाईलवर यांचं रेडिओ स्टेशन सुरू होते. संचारबंदी कडक होऊन काम बंद झाले तर काय, असा फारसा विचार ते करताना दिसत नाहीत. गावाकडून आणलेले धान्य जूनपर्यंत पुरेल का, इतकाच काय तो ते अंदाज बांधतात. भाजीपाला खरेदीसाठी लक्ष्मीपुरी गाठतात. महिलावर्ग काम करून जेवणाची जबाबदारी सांभाळत आहे.

"माझे वडील डांबरीकरणाच्या कामात होते. मी लहान असताना त्यांच्याबरोबर येत होतो. मुकादम म्हणून मी आता काम करतोय. कुटुंबाला घेऊन मी दरवर्षी येथे येतो. मुलगा नीलेश बारावी शिकला असून, तोही आलाय. अन्य दोन मुले कॉलेजच्या वसतिगृहात आहेत. मी या कुटुंबांसमवेत राहुटीतच राहतो. कोल्हापूरची माणसं मदत करणारी आहेत. आमचं काम सुरू असल्याने आता मदतीची आवश्‍यकता नाही; मात्र गरज पडली तर नक्की देतील, याचा आम्हाला विश्वास आहे."

- वालू रेऊ राठोड (मुकादम)