
कोल्हापूर विभागात १८ मुलांना १०० टक्के गुण
कोल्हापूर : मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेमध्ये कोल्हापूर विभागातील १८ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले. यामध्ये कोल्हापुरातील नुपूर शिरिष खांडेकर, केतकी पाटील तर जयसिंगपूर येथील वेदांत सुधाकर झेंडे यांचा समावेश आहे. निकाल आज दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला. कोल्हापूर विभाग राज्यात दुसरा आला. निकालाची टक्केवारी ९८.५ आहे. विभागात कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक ९८.९४ टक्के आहे. ४८.४५ टक्के विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य श्रेणी (७५ टक्क्यांपेक्षा अधिक) मिळाली, अशी माहिती कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव दत्तात्रय पोवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
कोरोनाचे सावट काही प्रमाणात दूर झाल्यानंतर यंदा दहावीची परीक्षा लेखी आणि तोंडी माध्यमातून झाली. विभागाचा निकाल ९८.५ टक्के आहे. विभागाचा राज्यात दुसरा आला, तरी गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या निकालात थोडी घट आहे. गतवर्षी विभागाचा निकाल ९९.९२ होता. सांगली जिल्हा ९८.१०, तर साताऱ्याचा निकाल ९८.२० आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. कला, क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी करणाऱ्या ३६ हजार ५४९ विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ झाला आहे. पुनःप्रविष्ट विद्यार्थ्यांपैकी ३ हजार २३१ जण परीक्षेस बसले होते. त्यातील २ हजार ५७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळी शिक्षण उपसंचालक एम. जे. चोथे, साताऱ्याच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, लेखाधिकारी एस. एल. रेणके, वरिष्ठ अधीक्षक एस. एस. कारंडे, एस. वाय. दुधगावकर, सहायक अधीक्षक व्ही. पी. पाटील, वरिष्ठ लिपिक रवी शिंगाडे उपस्थित होते.
निकाल असा
जिल्हा - नोंदणी - परीक्षा दिलेले - उत्तीर्ण - टक्केवारी
कोल्हापूर ५४,०३० ५३, ९३३ ५३, ३६४ ९८.९४
सांगली ३८,५०६ ३८,३०१ ३७,५७६ ९८.१०
सातारा ३८,७६१ ३८,६०१ ३७,९४४ ९८.२९
एकूण १,३१,२९७ १, ३०, ८३५ १,२८,८८४ ९८.५०
गुण
गुण विद्यार्थी संख्या
७५ ते ८० १८,३५७
८० ते ८५ १८,२७४
८५ ते ९० १५,६४०
९० टक्क्यांपेक्षा जास्त ११,४२५
ग्रामीण विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी यंदाही सर्वोत्तम कामगिरी केली. सर्वच तालुक्यांचा निकाल ९८ टक्क्यांहून अधिक आहे. अनेक शाळांचे निकालही १०० टक्के असून बहुतांशी विद्यार्थ्यांना प्रथम आणि विशेष प्रावीण्य श्रेणी मिळाली आहे. तालुकावार निकालात गडहिंग्लजचा सर्वाधिक ९९.७३ टक्के निकाल आहे. कोरोनामुळे लॉकडाउन, ऑनलाईन अध्यापन, ऑनलाईनची अपुरी साधने या सर्व अडथळ्यांचा सामना करत ग्रामीण विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.
तालुका निकाल
आजरा ९९.५७
भुदरगड ९९.६२
चंदगड ९९.५९
गडहिंग्लज ९९.७३
गगनबावडा ९९.४१
हातकणंगले ९८.८७
कागल ९८.३५करवीर *९८.९
कोल्हापूर ९८.२
पन्हाळा ९९.३६
राधानगरी ९९.७०
शाहूवाडी ९९.१८
शिरोळ ९८.६१
११ विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवला
परीक्षेमध्ये गैरप्रकार केल्याप्रकरणी ११ जणांवर कारवाई केली गेली. यामध्ये साताऱ्यातील ४, सांगलीमधील ३ आणि कोल्हापुरातील चौघांचा समावेश आहे. त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत.
Web Title: Ssc Result 2022 100 Percent Marks For 18 Students In Kolhapur Division
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..