संपाचा तिढा न सुटल्याने कारवाईच्या भीतीने एसटी चालकाची आत्महत्या | ST Driver Suicide | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhanaji Vaydande Suicide

संपाचा तिढा न सुटल्याने कारवाईच्या भीतीने एसटी चालकाची आत्महत्या

कोनवडे : एसटी कर्मचारी संपाचा तिढा न सुटल्याने नाधवडे (ता. भुदरगड) येथील धनाजी मल्हारी वायदंडे (वय ३९) या एसटीच्या चालकाने कारवाईची भीती व आर्थिक विवंचनेतून राहत्या घरी तुळईला गळफास घेऊन आत्महत्या केली. या दुर्दैवी घटनेबाबत लोकांमधून हळहळ तर कर्मचाऱ्यांमधून शासनाबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, २८ ऑक्टोबरपासून विलिनीकरण मुद्यावरून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. संप अद्याप न मिटल्याने अनेक कर्मचारी आर्थिक विवंचनेतून तणावात वावरत आहेत. गेल्या तीन महिन्यापासून कुटुंबाची परवड झाल्याने कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात मानसिक खच्चीकरण झाले आहे. मयत धनाजी वायदंडे हे १२ वर्षे चालक म्हणून सेवा बजावीत होते. ते गेली ८ वर्षे गारगोटी आगाराकडे काम पाहत होते. वायदंडे हे इतर कर्मचाऱ्यांबरोबरच संपात सहभागी झाले होते. त्यांची घरची आर्थिक परिस्थिती प्रचंड हलाखीची आहे. संप काळात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवताना त्यांची ओढाताण होत होती. दरम्यान गेल्या ५ जानेवारी रोजी त्यांना गारगोटी आगारामार्फत शिस्त व आवेदन कार्यपद्धतीअंतर्गत कारवाई सुरू करण्याची नोटीस बजावली होती. सदर नोटिस आज मंगळवार (ता. ११) रोजी त्यांना मिळाली त्यामुळे ते प्रचंड मानसिक ताणतणावाखाली गेले. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले.

दरम्यान भुदरगड तालुक्यातील ही दुसरी दुर्दैवी घटना घडल्याने शासनाच्या वेळकाढू धोरणाबद्दल कर्मचाऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वायदंडे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गारगोटी येथील ग्रामीण रुग्णालयात नेल्यानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी मोठी गर्दी करत शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. सदर घटनेची नोंद भुदरगड पोलिसात झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात दिल्यानंतर कुटुंबीयांनी केलेला आक्रोश उपस्थितांची मने हेलावून टाकणारा होता.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurST Worker Strike
loading image
go to top