esakal | अंधार पडेल तिथे मुक्काम... पहाटे पुन्हा पायपीट

बोलून बातमी शोधा

Stay Where It's Dark ... Walking Again In The Morning Kolhapur Marathi News

ते सर्वजण मूळचे जळगाव जिल्ह्यातील. पोटाची खळगी भरण्यासाठी एका बांधकाम कंत्राटदाराने त्यांना दूर गोव्यात नेले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे सर्व बांधकामे ठप्प झाली. त्यामुळे पोटाची उपासमार सुरू झाली. काही ख्रिस्ती बांधवांनी त्यांची काही दिवस सोय केली. मात्र असे किती दिवस थांबून राहायचे? त्यापेक्षा आपला गाव गाठलेला बरा

अंधार पडेल तिथे मुक्काम... पहाटे पुन्हा पायपीट
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सिद्धनेर्ली ः ते सर्वजण मूळचे जळगाव जिल्ह्यातील. पोटाची खळगी भरण्यासाठी एका बांधकाम कंत्राटदाराने त्यांना दूर गोव्यात नेले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउनमुळे सर्व बांधकामे ठप्प झाली. त्यामुळे पोटाची उपासमार सुरू झाली. काही ख्रिस्ती बांधवांनी त्यांची काही दिवस सोय केली. मात्र असे किती दिवस थांबून राहायचे? त्यापेक्षा आपला गाव गाठलेला बरा. या उद्देशाने त्यांनी ऑनलाईन प्रक्रिया केली. मात्र यातील अज्ञानामुळे ती पूर्ण न झाल्याने त्यांना काहीच समजले नाही. त्यांनी आपल्या सामानाची गाठोडी बांधली. ती डोक्‍यावर घेतली. पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. आज सलग सातव्या दिवशी ते बामणी (ता. कागल) येथे दोनशेपेक्षा जास्त किलोमीटरचे अंतर पायी कापून पोहोचले आहेत. 

माळावरील शेतात त्यांनी आपला रात्रीचा मुक्काम ठोकला. त्यांची चौकशी केली असता त्यांनी आपली व्यथा मांडली. काही लोकप्रतिनिधींनी चौकशी केली मात्र पुढे काही झाले नाही. एकूण चौदा जणांचा हा ताफा आहे. यामध्ये सात वर्षाच्या मुलापासून सत्तर वर्षाच्या वयोवृद्धाचा समावेश आहे.

एकूण नऊ पुरुष, दोन महिला व तीन लहान मुले असे हे सर्व जण डोकीवर गाठोडे, पोटात भुकेचा आगडोंब, मनात गावाकडे जाण्याची ओढ अशा अवस्थेत ते पायपीट करत आहेत. कोरोनाच्या धास्तीमुळे जवळ कोण उभा करून घेत नाही. अशा अवस्थेत पायात गोळे येत असतानाही ते गावाच्या ओढीने चालतच आहेत. अंधार पडेल तिथे रात्रभर थांबायचे. पहाटे लवकर उठून मजल-दरमजल करीत दररोज किमान पंचवीस ते तीस किलोमीटर पायपीट करायची हा त्यांचा दिनक्रम.