चित्रनगरीचा वनवास संपला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chitranagari

चित्रनगरीचा वनवास संपला

‘जोतिबा मालिकेच्या वेळी तुम्ही आलता की. त्या वेळचा सगळा सेट आपल्या चित्रनगरीनं घेतला. नवीन स्टुडिओत हिंदी मालिकेसाठी उभारलेला सेटबी चित्रनगरीनंच घेतला… लॉकडाउननं बोंब केली हो. नाही तर आता इथं चित्रीकरणासाठी जत्रा फुलली असती बघा...’ चित्रनगरीतील सुरक्षारक्षक म्हणून कामाला असलेले चंद्रकांत कांबळे भरभरून सांगत असतात. थोडे दिवस थांबा, साहेबांची बैठक लवकरच लागणार आहे. येत्या महिनाभरात आणखी चित्रीकरण नक्की सुरू होईल, असं सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान झळकत असतं...

शांतता, शूटिंग सुरू आहे...

आर. के. नगरातून भारती विद्यापीठाकडे जातानाचा चढ चढून पुढं जात डावीकडं नजर टाकली की चित्रनगरीत काही तरी सुरू असल्याचं नक्की जाणवतं. भारती विद्यापीठाला वळसा घालून चित्रनगरीकडं जाताना रस्त्याच्या बाजूला आता भूखंड विक्रीचे फलक आणि मोठ्या इमारती लक्ष वेधून घेतात. मुख्य रस्त्यावरून चित्रनगरीकडं वळताना मोरेवाडीकडं जाणाऱ्या रस्त्याचं काम रणरणत्या उन्हातही सुरू असतं. चित्रनगरीत प्रवेश करताच चंद्रकांतना फोन केल्यावर पाटीलवाड्यातील कार्यालयात येण्याविषयी ते सांगतात... येथे कार्यालयात पोहोचल्यावर त्यांचा उत्साह आणखी वाढतो, ‘सुटी असल्यानं भांदिगरेसाहेब नाहीत. मात्र, मी माहिती देतो सगळी असं ते आवर्जुन सांगतात आणि इथे मेकअपरूम आहे, इथे कार्यालय आहे...अशी एकेक गोष्ट ते दाखवू लागतात. पाटीलवाड्यातील मागील खोलीत एका मालिकेसाठी किचन रूमचा सेट लावला होता. हा सगळा सेट चित्रनगरीनं घेतल्याचं सांगताना ते तेथील प्रत्येक गोष्टीबाबत सविस्तर बोलतात. पाटीलवाड्याचा दोन्ही बाजूंनी असलेला जुना आणि नवा लूक कसा आहे, तेथे आणखी कुठली कुठली कामं होणार आहेत, याबाबतही ते सांगत राहतात.

‘चला, आता गाड्या काढूया. खालचा स्टुडिओ दाखवतो,’ म्हणतात...आमच्या मोटारसायकली कोर्टाच्या इमारतीला वळसा घालून पुढे नव्या स्टुडिओकडे धावू लागतात. या दरम्यानच्या मार्गावरही रस्त्याची, पथदिव्यांची, लॉनची अशी विविध कामं पूर्ण होत असल्याचे दिसून येते तेवढ्यात संत गजानन महाराजांचे छायाचित्र लक्ष वेधून घेते. ‘शेगावीचे संत गजानन’ या मालिकेचं इथं चित्रीकरण सुरू होतं. मात्र, चॅनेलच्या नियमानुसार फोटो न घेण्याची विनंती प्रॉडक्शन मॅनेजर दत्ता पाटील करतात. तिथून पुढे मग आमचा मोर्चा नव्या स्टुडिओकडं वळतो आणि या स्टुडिओचा दरवाजा उघडताच भव्य सेट समोर उभा ठाकतो. ‘मेहंदी है रचनेवाली’ या मालिकेसाठी उभारलेला हा सेट मालिका संपल्यानंतर चित्रनगरी व्यवस्थापनाने आहे तसा आपल्याकडे घेतला आहे, असे चंद्रकांत सांगतात. हा सेट म्हणजे जणू एक भला मोठा बंगलाच. प्रशस्त हॉल, उंची वस्तू, भले मोठे दरवाजे, डायनिंग टेबल, कलात्मक झुंबरं, बेडरूम, इंटेरियर या साऱ्या गोष्टी पाहिल्या की प्रत्यक्ष शूटिंगवेळी इथे काय माहौल असेल, या विचारानं थक्क व्हायला होतं. विशेष म्हणजे स्टुडिओ वातानुकुलित असून सुरक्षाविषयक सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केल्याचे प्रकर्षाने जाणवते.

सेटच्या निमित्ताने प्रॉपर्टी...

एखाद्या मालिकेचे किंवा सिनेमाच्या शूटिंगसाठी सेट उभारल्यानंतर नियमानुसार सर्व शूटिंग पूर्ण झाले की तो तोडण्याशिवाय पर्याय रहात नाही. मात्र, चित्रनगरी व्यवस्थापनाने संबंधित निर्मात्यांकडून काही सेट घेऊन ते आहे तसे ठेवले आहेत. त्यामुळे चित्रनगरीच्या प्रॉपर्टीतही भर पडली आहे. विशेष म्हणजे ‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिकेच्या सेटमध्ये काही बदल करून तिथे आता ‘शेगाविचे संत गजानन’ या मालिकेचे शूटिंग सुरू आहे. कोणत्याही पौराणिक मालिकांसाठी हा सेट कायमपणे वापरणे शक्य आहे आणि मुळात तो मोकळ्या जागेवर उभारला आहे. स्टुडिओतील ‘मेहंदी है रचनेवाली’ मालिकेचा सेटही कुठल्याही कौटुंबिक मालिकेच्या शूटिंगसाठी आवश्यक बदल करून वापरता येणे शक्य आहे.

चित्रनगरीच्या उत्पन्नातून महसूल शक्य

चित्रनगरतील फेरफटक्यानंतर चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक संजय पाटील यांच्याशी संवाद साधला, ते म्हणाले, ‘पालकमंत्री सतेज पाटील, सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, सांस्कृतिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रनगरीत विविध कामे पूर्ण झाली आहेत आणि पुढील टप्प्यातील अनेक कामे प्रस्तावित आहेत. या कामांसाठी निधी मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर लवकरच ही कामे सुरू होतील. त्याचवेळी आणखी काही मालिका, सिनेमांच्या चित्रीकरणासाठीचे प्रस्ताव आले असून त्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल आणि प्रत्यक्ष चित्रीकरणाला प्रारंभ होईल. दुसऱ्या टप्प्यातील निधी उपलब्ध झाल्यानंतर चित्रनगरी स्वयंपूर्ण होणार आहे. त्यानंतर शासनाकडून निधीपेक्षा चित्रनगरीच्या उत्पन्नातूनच शासनाला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळणार आहे.’

तीन तपांचा वनवास

२५ सप्टेंबर १९८४ ला तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते चित्रनगरीचा कोनशिला समारंभ झाला. तेव्हापासून ते गेल्या चार-पाच वर्षांपर्यंत तब्बल तीन तपांचा विचार केला तर चित्रनगरीचा प्रकल्प वाचवण्यापासून ते तिच्या पुनरूज्जीवनासाठी मोठा संघर्ष करावा लागला. हा प्रकल्पच कोल्हापुरातून हलवण्याचा काहींचा प्रयत्न सुरू असताना कोल्हापुरी स्टाईलमध्ये ‘आमचा पैलवानकीचा हिसका दाखवू,’ असा सज्जड दमच दिला गेला आणि हा प्रकल्प येथेच राहिला. काहीच होत नसल्याने मोरेवाडी गावची ही जागा ग्रामपंचायतीला पुन्हा मिळावी, अशी मागणीही होऊ लागली. मात्र, अलीकडच्या चार ते पाच वर्षांत येथे विविध सुविधांसाठी निधी उपलब्ध झाला आणि आता खऱ्या अर्थाने चित्रनगरीची शूटिंग डेस्टिनेशन म्हणून ओळख निर्माण झाली आहे. कोल्हापूरची सिनेसृष्टीची माहेरघर ही ओळख पुन्हा निर्माण करण्याची ही नांदी आहे... हे सुखावह विचार सोबत घेऊन बाहेर पडलो...

पहिल्या दोन टप्प्यांत झालेली कामे

 • पहिल्या टप्प्यांतर्गत अठरा चित्रीकरण स्थळे उपलब्ध

 • अस्तित्वात असलेल्या स्टुडिओचे नूतनीकरण व विस्तारीकरण

 • पाटील वाड्याचे विस्तारीकरण व पहिल्या मजल्यावर चित्रनगरी महामंडळाचे कार्यालय

 • बसथांबा व अन्य देखाव्यांची उभारणी

 • दहा एकरात बागबगीचा व परिसर विकास

 • वाहनतळ उभारणे

 • वीस एकर परिसरात अंतर्गत रस्ते, भूअंतर्गत नाले, पथदिवे-दुभाजक

 • पूल व मोऱ्यांचे बांधकाम

 • स्टुडिओत वातानुकूलित यंत्रणा

 • अग्निशमन यंत्रणा उभारली

 • पाणीपुरवठा यंत्रणा, पंपाची उभारणी

 • शंभर बाय नव्वद चौरस फूट आकाराची ‘टॉक शो’ स्टुडिओ शेड

 • सहा मेकअप रूप, सहा स्वच्छतागृहे आणि गोदाम

तिसऱ्या, चौथ्या टप्प्यातील प्रस्तावित कामे

 • चित्रनगरी परिसरात मंदिराची उभारणी

 • रेल्वे इंजिन, डब्यांसह रेल्वेस्थानकाची उभारणी

 • चित्रीकरणासाठी जुन्या पद्धतीची चाळ

 • आणखी एक नवीन वाडा

 • तंत्रज्ञ व सहकलाकारांसाठी २० खोल्यांचे वसतिगृह

 • अंतर्गत रस्त्यांची सुधारणा व पथदीप

 • दीडशे बाय शंभर चौरस फुटांचा स्टुडिओ

 • असा मिळतो रोजगार

 • एका मालिकेच्या निमित्ताने किमान ६० जणांना रोजगार

 • चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्ताने किमान १०० जणांना रोजगार

 • चित्रपटांपेक्षा मालिकांच्या शूटिंगमुळे किमान वर्षापासून चार वर्षांपर्यंत कायमस्वरूपी रोजगाराची संधी

 • बिगबजेट वेबसीरिज आणि कॉर्पोरेट जाहिरातीसाठीही चित्रनगरीला पसंती

विविध कामांवर आजअखेर झालेला खर्च.........२१ कोटी

प्रस्तावित कामांसाठी अपेक्षित निधी...............२७ कोटी