
‘मण्यार’ चा दंश ठरला जीवघेणा: भावापाठोपाठ बहिणीचाही मृत्यू
आळसंद (सांगली) : येथील भाळवणी रस्त्यावर राहणाऱ्या सुनील कदम यांच्या राहत्या घरात मण्यार जातीच्या सर्पाने दंश केल्याने सख्ख्या भावाच्या पाठोपाठ बहीण सायली वृषभ जाधव (Sayli Jadhav) (वय २४) यांचा सांगलीच्या (Sangli) वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. सायलीच्या मृत्यूने परिसर शोकसागरात बुडाला आहे.
बुधवारी (ता. ६) रात्री जेवण झाल्यानंतर विराज यांच्यासह सर्वजण झोपले होते. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास मण्यारने विराज सुनील कदम (वय १६) याला दंश केला. हा प्रकार नातेवाइकांच्या रात्री उशिरा लक्षात आला. रुग्णालयात दाखल करीत असताना विराजला मृत्यूने कवटाळले. विराजच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ८) होता. गुरुवारी रात्री सर्वजण झोपले असताना बसलेल्या मण्यार सर्पाने माहेरी आलेल्या बहीण सायलीला दंश केला. तिला विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथून सांगलीला वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिचा तब्बल आठ दिवसांनी मृत्यू झाला. आज (ता. १६) सकाळी नऊ वाजता सायलीच्या पार्थिवाला शोकाकुल वातावरणात पती वृषभ यांनी मुखाग्नी दिला. सायलीला शरण्या ही एक वर्षाची मुलगी आहे.
अनेकांच्या चुली पेटल्या नाहीत.
आळसंदमध्ये सुनील कदम हे शिवणकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. अत्यंत मनमिळाऊ असणारे कदम कुटुंबीय. आठ दिवसांच्या फरकाने बहीण-भावाला मृत्यूने कवटाळले. त्यांच्या जाण्याने परिसर शोकसागरात बुडला आहे. आज पहाटे सायलीच्या निधनाची वार्ता कानी पडली. अनेकांनी दुपारपर्यंत चुली पेटवल्या नाहीत.