टीईटी, नेट परीक्षा आता एकाच दिवशी : तारखांचा गोंधळ संपणार कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टीईटी परीक्षा

टीईटी, नेट परीक्षा आता एकाच दिवशी : तारखांचा गोंधळ संपणार कधी?

sakal_logo
By
युवराज पाटील

शिरोली पुलाची : राज्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेच्या तारखांमध्ये तीनवेळा बदल झाल्यानंतरही गोंधळ सुरू असल्याचे चित्र आहे. आता २१ नोव्हेंबरला टीईटी परीक्षा होणार आहे; मात्र त्याचदिवशी प्राध्यापकपदासाठीची नेट परीक्षा आहे. यामुळे टीईटीच्या तारखेत पुन्हा बदल होणार का, असा प्रश्न परीक्षार्थीमधून होत आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे दोन वर्षांनंतर टीईटी १० ऑक्टोबरला होणार होती. मात्र, त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची लेखी परीक्षा असल्याने टीईटीच्या तारखेत बदल केला. पुढे ढकललेली टीईटी ३१ ऑक्टोबरला होणार होती, परंतु आरोग्य विभागाच्या परीक्षा ३१ ला असल्याने ही परीक्षा ३० ऑक्टोबरला होणार होती. त्या दिवशी विधानसभेच्या पोटनिवडणूक होती. त्यामुळे ही परीक्षा २१ नोव्हेंबरला नियोजित केली. आतापर्यंत तीनवेळा ही परीक्षा वेगवेगळ्या कारणांनी पुढे ढकलली. मात्र, तारखेचा घोळ संपत नसल्याचे चित्र आहे. आता याच दिवशी नेट परीक्षाही होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना दोनपैकी एकच परीक्षा देता येणार आहे. टीईटी आणि नेटचे प्रवेशपत्रही जारी केली आहेत.

हेही वाचा: मंडणगड : संस्थेच्या वादात शैक्षणिक नुकसान; पालक आक्रमक

एनटीए या एजेन्सीद्वारे युजीसी नेट परीक्षा घेते. जूनमध्ये होणाऱ्या नेट परीक्षांच्या तारखेदरम्यान होणाऱ्या इतर स्पर्धा परीक्षांच्या तारखा एकच असल्याने पुढे ढकलली होती. आता ही परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत या दरम्यान होणार आहे.

परीक्षार्थींची खंत

‘टीईटी’चे वेळापत्रक वारंवार बदलले जात असल्याने परीक्षार्थींनी परीक्षा परिषदेवर टीकेची झोड उठवली आहे. परिषदेकडून आतापर्यंत तीन वेळा वेळापत्रक बदलले आहे. हजारो परीक्षार्थींचा विचार केला जात नसल्याची खंत विद्यार्थी व्यक्त करत आहेत.

"परीक्षेच्या तारखांचे नियोजन करताना राज्य व केंद्राच्या शिक्षण विभागामध्ये समन्वय पाहिजे. त्यांच्यात समन्वय नसल्याचा फटका विद्यार्थ्यांना बसतो."

-दौलत पाटील, कार्याध्यक्ष, शिवराज एज्युकेशन सोसायटी, टोप.

loading image
go to top